बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात महिनाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात विविध सामाजिक संघटना नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही संघटनांनी दररोज हजारो गरजूंना अन्नदान केले. दुसऱ्या लाटेत ही रुग्णसंख्या वाढत आहे. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी रुग्ण व नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये जवळपास ७०० रुग्ण ॲडमिट आहेत. या रुग्णासाठी, निराधार व निराश्रित यांच्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून मोफत अन्नदान सुरू आहे. लॉकडाऊन काळात मोफत डब्याचा आकडा हा दोन हजारांवर गेला.
भाऊसाहेब आंधळकर यांच्या राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्राच्या वतीने दाल व भात वाटप आजही सुरू आहे. बाजार समितीत व्यापारी व राजाभाऊ राऊत मित्रमंडळाच्या वतीने शहरातील कोरोना हॉस्पिटलमध्ये दोन वेळेचे जेवण, नाश्ता आणि पवनी, तसेच या अन्न छत्राच्या वतीने बागवान मशिदीमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना राहण्याची सोय केली आहे. भगवंत मोफत सेवा केंद्राच्या वतीने शहरातील अलीपूर रोडवर रेणुका मंगल कार्यालयात कोविड रुग्णांच्या नातेवाइकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. माजी मंत्री दिलीप सोपल, महाहौसिंगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी स्वखर्चातून संयुक्त उपक्रम सुरू केला आहे.
---
वैरागमध्ये डॉक्टर एकवटले
वैरागला डॉक्टर मंडळी एकत्र येत ऑक्सिजन बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. बाजार समितीच्या शंभर बेडच्या कोविड केअर सेंटरचे काम सुरू आहे. तानाजी सावंत यांनी एक हजार बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे.
शहरातील विविध हॉस्पिटलला रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजन सिलिंडरची सोय व्हावी यासाठी आ. राजेंद्र राऊत, बन्सीधर शुक्ला व अजित कुंकुलोळ हे प्रयत्नशील आहेत. अभाविपच्या वतीने रुग्णांना बेड कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, तसेच प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी धडपडत आहेत.
--
मातृभूमी प्रतिष्ठानची ऑक्सिजन सिलिंडर बँक
मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने ऑक्सिजन सिलिंडर बँक सुरू केली आहे. रविवारपासून ही बँक सुरू होत आहे. शहरातील कोरोना उपचार करणारे हॉस्पिटल व मातृभूमी यांनी सुमारे तीस लाख रुपये किमतीचे १५० सिलिंडर अहमदाबाद येथून खरेदी केले आहेत. हे सिलिंडर लोणंद येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून भरून आणले जाणार आहेत. शहरातील कोरोना हॉस्पिटलला ना नफा ना तोटा तत्त्वावर उपलब्ध करून देत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी सांगितले.