बार्शी : २००४ साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तालुक्यातील देवगाव येथे झालेल्या गोळीबार व गोंधळ प्रकरणाचा अंतिम निकाल बार्शीतील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह सर्व दहा आरोपींची निर्दोष मुक्तता करीत असल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ एस़ पाटील यांनी दिला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर बार्शी न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या निकालाकडे बार्शीच नव्हे तर संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले होते.
या निकालाकडे बार्शी तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले होते. २००४ साली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानिमीत्त शिवसेनेचे तत्कालिन उमेदवार राजेंद्र राऊत यांची देवगाव येथे सभा सुरु असताना गोंधळ झाला होता. त्याचदरम्यान गोळीबार ही झाला होता़ याचवेळी राजेंद्र राऊत हे जखमी झाले होते. याप्रकरणी ११ आॅक्टोबर २००४ रोजी पांगरी पोलीस स्टेशनचे तत्कालीन सपोनि निवृत्ती कसबे यांनी दिलेल्या फियादीवरुन राजेंद्र राऊत, नवनाथ चांदणे, हरिभाऊ कोळेकर, अजित बारंगुळे, भिमजी पवार, अरुण नागणे, भाऊसाहेब कांबळे, चंद्रकांत धस, सुरेश धस,महादेव मांजरे, संजय राऊत, दशरथ माने, हरिश्चंद्र धस, संजय बारंगुळे व विठ्ठल पायघन या १५ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणाची सुरुवातीची सुनावनी ही सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झाली व त्यानंतर बार्शी येथे अति. जिल्हा व सत्र न्यायालय झाल्यानंतर या प्रकरणाच्या सुनावनीला खºया अर्थाने गती मिळाली. या प्रकरणातील १५ आरोपीपैकी दशरथ माने, हरिचंद्र धस, संजय बारंगुळे, व विठ्ठल पायघन हे मयत झाले आहेत तर एक संशयीत आरोपी हा निष्पन्नच झाला नाही़ सुनावनी दरम्यान या प्रकरणात दहा साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड़ नंदकुमार फडके तर संशयीत आरोपींच्या वतीने अॅड़ हर्षद निंबाळकर व सागर रोडे, अॅड सुभाष जाधवर, ओंकार उकरंडे पुणे व अॅड़ प्रशांत एडके यांनी काम पाहिले.