बार्शी : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी शहरातील पायलट ट्रेनिंग सेंटरमधून साचीने कमर्शिअल पायलट अभ्यासक्रम पूर्ण केला. या प्रशिक्षणादरम्यान तिने वेगवेगळ्या विमानांमधून सुमारे २५० तास विमान चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.
बार्शीच्या साची सत्येन वाडकर या युवतीने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी जागतिक पातळीवर वैमानिक होण्याचा बहुमान संपादन केला आहे. कमी वयात हे यश मिळविणारी साची जिल्ह्यातील पहिली युवती असल्याचे बोलले जाते.
साचीने शहरातील सेंट जोसेफ स्कूल येथे प्राथमिक व श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण तिने पूर्ण केले. त्यानंतर तिने रेडिओ टेलिकम्युनिकेशन, मौखिक परीक्षा आणि मुलाखत या पात्रता परीक्षा दिल्या. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिची शारीरिक क्षमता पात्रता चाचणी झाली. या सर्व सोपस्कारानंतर साचीला अमेरिकेतील पायलट ट्रेनिंग सेंटर या संस्थेमध्ये प्रवेश मिळाला. अमेरिकेतील हवामान, खाद्यजीवन त्यांच्याशी समरस होत तिने हा अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला.
या अभ्यासक्रमादरम्यान साचीने इंस्ट्रमेंटल रेटिंग, कमर्शियल पायलट लायसनिंग, नेवीगेशन हे विषय अभ्यासले. भविष्यामध्ये भारतीय हवाई दलामध्ये जाण्याची इच्छा साचीने व्यक्त केली. ती लवकरच भारतामध्ये परत येत आहे. मायदेशी राहूनच अंतराळात विहार करण्याची तिची इच्छा आहे. तिच्या यशात वडील सत्येन वाडकर व आई श्वेता वाडकर यांचा मोठा वाटा आहे. बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका वर्षा ठोंबरे, सेंट जोसेफचे बिपिन फादर यांनी तिचे कौतुक केले.
बालपणापासूनच ध्येय निश्चिती हवी.. वैमानिक बनणे हे बालपणापासूनच माझे स्वप्न होते. स्वप्नपूर्तीचा मला खूप आनंद आहे. नव्या क्षेत्रामध्ये करिअर करताना पालकांचे खंबीर पाठबळ मिळाले. जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करता आली पाहिजे. शालेय जीवनामध्ये ध्येय निश्चिती झाली पाहिजे, असे मनोगत साची वाडकर हिने अमेरिकेतून (कॉल कॉन्फरन्सिंग) द्वारे लोकमत प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.