बेंबळे: पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस पडलेला नाही. उजनी धरणातील पाणीसाठ्यात वरचेवर घट होत आहे. यामुळे नागरिक, उद्योजक, शेतकरी व कारखानदारांत चिंतेचे वातावरण आहे.गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उजनी धरणात केवळ उणे २६.७३ टक्के पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी उजनी धरण उणे ४८ टक्क्यापर्यंत खाली आले होते. परंतु जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने उजनी धरण उणे १५.०७ टक्के झाले. यावर्षी पावसाने चांगलीच ओढ दिल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील १८ टक्के धरणातील पाण्याची स्थिती खूपच बिकट झाली आहे.सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या भीमा खोऱ्यातील १९ धरणांची पाणीस्थिती बिकट झाली आहे. पावसाने अशीच ओढ दिली तर या तीन जिल्ह्यांवरील दुष्काळाचे सावट गडद होणार आहे. याच जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. गेल्यावर्षी धरणाच्या पाणीसाठ्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो हेक्टरवर विविध पिके, ऊस, फळबागा केल्या. मात्र पावसाअभावी पूर्ण पिकेच हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस सुरू असताना पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही. उजनी धरणावरील १८ धरणांपैकी १० धरणांतील पाणीसाठा दोन अंकीसुद्धा नाही. त्यामुळे या खोऱ्यातील जनजीवन पाण्यामुळे विस्कळीत झाले आहे. राहिलेल्या दोन-अडीच महिन्यांत तरी चांगला पाऊस पडावा यासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहेत. गेल्यावर्षी या तारखेला दौंड येथून उजनीत ५००० क्युसेक्स विसर्ग येत होता, मात्र आता कोठूनही विसर्ग नाही.------------------------------गतवर्षीपेक्षा यंदा स्थिती बिकटसध्या उजनी धरणात पाण्याची पातळी ४८८.७४७ मीटर तर एकूण पाणीसाठा ४९.३३ टक्के आहे. मृत साठ्यातील १४.३२ टीएमसी पाणी वापरले गेले आहे. एकूण टक्केवारी उणे २६.७३ टक्के आहे. गेल्यावर्षी याच तारखेला उजनी धरणाची पाण्याची पातळी ४८९.८१२ मीटर होती. एकूण पाणीसाठा ५५.६४ टीएमसी होता. टक्केवारी उणे १५ टक्के होती. म्हणजेच गेल्यावर्षी उजनी धरणात आतापेक्षा सहा टीएमसी पाणी अधिक होते.
‘उजनी’ने गाठला तळ
By admin | Published: July 19, 2014 1:05 AM