- राजकुमार सारोळेसोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यात पुरेसा पाऊस पडला नाही, तरीही हा तालुका दुष्काळाच्या यादीतून वगळला. प्यायला पाणी नाही, त्यामुळे आंघोळ आठ दिवसांतून एकदाच करतो, अशा प्रतिक्रिया उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. पाण्याअभावी शेतीच पिकली नसल्याने गावातील तरुण रोजगारासाठी वीज कंपनीच्या ठेकेदाराकडे कामाला गेले आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यातील वांगी गावाला भेट दिली तेव्हा आडावर पाणी भरण्यासाठी गर्दी दिसली. सोमनाथ गवळी हे दोरीने ९० फूट खोल आडात उतरले होते व आतून रहाटावरुन येणाऱ्या घागरीत पाणी भरून देत होते. एकेकाळी हे गाव पाणीदार होते. गावाशेजारून वाहणाºया ओढ्यात पाणी असायचे अन् त्यामुळे गाव व शिवारातील विहिरी पाण्याने भरलेल्या असायच्या. पण आज या गावात भयावह स्थिती आहे. आठशे फूट बोअर मारल्यावरही पाणी मिळत नाही. ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. ग्रामपंचायतीने मारलेल्या बोअरला थोडे पाणी येत असल्याने त्यावर ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. पण विजेचा खोळंबा झाल्यावर मात्र गावात असलेल्या निजामकालीन आडातून पाणी काढावे लागते.
आंघोळही करावी लागते आठवड्यातून एकदाच! वांगीतील व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 5:35 AM