: सीईओंच्या आदेशानंतर बीडीओ, आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी हे आता फिल्डवर जाऊन कर्मचारी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्यक्ष काम करतात की नाही, याची तपासणी करताना दिसत आहेत. तालुक्यातील वाढणारी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ही धडपड सुरू असल्याचे दिसून येेते.
गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात व गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांना कारणे दाखवा नोटीस बजावीत त्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली आहेत. त्यानंतर तालुक्याच्या मुख्यालयात कायम नागरिकांना दिसणारे संबंधित हे सर्व अधिकारी आता गावोगावी फिरत आपले कर्मचारी कोरोनाबाबत योग्य काम करतात की नाही, याची पाहणी दुपारपर्यंत करीत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नुकतेच जिल्ह्यातील कोरोनाबाबतचे सर्वेक्षण करण्यास सर्व शिक्षकांना आदेश पारित केले. प्रत्येक गावात शिक्षक हे कोरोनाचे रुग्ण शोधण्याबरोबरच त्याचा सर्वे देखील करू लागलेले आहेत. मात्र, असे असतानाही आकडेवारी पाहता शिक्षकांचे काम समाधानकारक नसल्याने सीईओ दिलीप स्वामी यांनी त्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी फिल्डवर गेल्याने कार्यालयातील कर्मचारी कामकाजात दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कामे होताना दिसत नाहीत.
कोट ::::::::::
सीईओ दिलीप स्वामी यांनी माझ्यासह आरोग्य अधिकारी थोरात व गटशिक्षणाधिकारी फडके यांनाही याबाबत खुलासा विचारला आहे. तालुक्यातील कोरोनाची रुग्ण संख्या पाहता आम्हाला ही नोटीस बजावलेली आहे. त्यानंतर तालुक्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय त्यांच्या नोटीसीचा खुलासा पाठविला आहे.
-
डॉ. संताजी पाटील,
गटविकास अधिकारी, माढा