सोलापूर- अलीकडे मुला-मुलींचे विवाह जमवणे एक समस्या होऊन बसली आहे. अनेकजण स्थानिक वधू-वर सूचक मंडळाकडे नाव नोंदवतात. मेळाव्याच्या माध्यमातूनही अनेकांचे विवाहाचे योग जुळून येतात. त्याच्या जोडीला आता ऑनलाईन नोंदणी करायची. भरमसाठ फी भरायची. यातून काहींचे विवाह जमतात तर काहींना पैसे भरल्यानंतर पुढे काहीच होत नाही. नाहक गंडवले जात असल्याच्याही व्यथा वधू-वरांच्या पित्यांकडून होऊ लागल्या आहेत. यासंबंधी तक्रार करायची म्हटले तरी पत्ते अर्धवट असणे, ज्या मोबाईलवरून फोन येतो तो पुन्हा लागत नाही अशावेळी कोणाला सांगायचे म्हणून अनेक मंडळी तक्रारी करायलाही पुढे येत नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
यासंदर्भात फसल्या गेलेल्या शिवाजी रणसुरे यांच्या मते औरंगाबादच्या एका संस्थेकडे त्यांच्या मुलासाठी ३५०० रुपये भरले. रोहिणी नामक महिला कर्मचाऱ्यांकडून स्थळाची माहिती सांगण्यात आली. प्रत्यक्षात शहानिशा करताना मात्र दिलेला पत्ता चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. थोडाफार असाच अनुभव शिवाजी सोमवंशी यांना आला. त्यांना धुळे येथील विवाह संस्थेकडून गौरी मॅडम बोलतेय म्हणून मोबाईलवरून फोन आला. वास्तविक त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची नोंदणी केलेली नव्हती. त्यांनी त्यांच्या भावाचा बायोडाटा कोठूनतरी मिळवला आणि स्थळांची अपुरी माहिती दिली. ३६०० रुपये भरल्यानंतर स्थळाचा बायोडाटा आणि बोलणे करून देण्याबद्दल सांगितले. अशी अनेक उदाहरणे असूनही उघडपणे कोणी बोलायला तयार नसल्याचे सांगण्यात आले.
संस्थेबद्दल माहिती नसताना पैसे भरायचे कसे?
पूर्वी कधी पाहिलेही नाही आणि ओळखीचे नसतानाही मोबाईलवरून आलेल्या एका फोनवरून ‘आम्ही लग्न जमवून देतो’ या वाक्यावर विश्वास कसा ठेवायचा? शिवाय अगोदर पैसे कसे भरायचे. पैसे पाठवण्यासाठी क्यूआर कोड पाठवला जातो. त्यानंतर व्हॉट्सॲपवरून नाहीसा केेला जातो. याबद्दल शहानिशा करूनच पुढचे पाऊल उचलावे, असे आवाहन शिवाजी सोमवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केेले.
लग्न ही आयुष्यभराची रेशीमगाठ बांधणारं पवित्र बंधन आहे. आपल्या मुला-मुलींची सोयरीक पाहत असताना अत्यंत सजगपणे शहानिशा करून पुढील प्रक्रिया पार पाडावी. अनोळखी फोनकॉलवर सहजासहजी विश्वास ठेवून खातरजमा करावी.
- रवींद्र जोगीपेठकर, सोयरीक प्रो.
पालकांच्या असाहाय्यतेचा गैरफायदा
- मुला-मुलींचं विवाह जमवण्यास विलंब होत असल्यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत. योग्य वयात मुलीचे हात पिवळे व्हावेत, अशी प्रत्येकांचीच इच्छा असते. नेमके पालकांच्या या भावनांचा काही मंडळी गैरफायदा घेऊन फसवणूक करतात. अशावेळी अत्यंत काळजीपूर्वक पाऊल टाकावे.
- श्याम कदम, सामाजिक कार्यकर्ते
-----