रवींद्र देशमुखसोलापूर : अहो, काय सांगू दाढीला एकदाही वस्तरा लावलेला नाही...जशी आली तशीच आजतागायत ठेवली. या दाढीनं कोणतंच नुकसान केलेलं नाही, उलटपक्षी फायदेच फायदे झाले...छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श म्हणून ही दाढी राखली...
सोलापूरच्या विविध क्षेत्रातील मान्यवर दाढीवाली मंडळी आपल्या दाढीचं रहस्य ‘लोकमत’ला सांगत होती. मर्दानी दाढीचा रुबाब नेहमीच न्यारा असतो, यावर सर्वांचेच मतैक्य होते. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जागतिक दाढी दिन साजरा केला जातो. विविध देशातील दाढीधारी लोक आपल्या कामधंद्यातून एक दिवसापुरते मुक्त होऊन आपापल्या देशातील दाढीवाल्यांच्या संमेलनात एकत्र येतात अन् आनंदोत्सव साजरा करतात. या दिवसाच्या पूर्वसंध्येला येथील सारेच मान्यवर आपल्या दाढीविषयी काही बोलून गेले.
दाढीविषयी काही.....- ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. धनंजय माने यांनी स्वत:च्या लग्नातील एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, विवाह समारंभात ‘नाव घेण्याची’ आपणाकडे एक प्रथा आहे. त्यावेळी माझ्या पत्नीने असे नाव घेतले होते, ‘सोलापुरात माने वकिलांची माडी, काढीन मी धनंजयरावांची दाढी.’- दाढीचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये पूर्ण दाढी, बकºयासारखी दाढी, आइसलेट दाढी, व्हॅन डिक, अँकर, चिन, डक टेलर, फ्रान्ज जोसेफ, सूवोरो, फ्रेंच कट आदी- दाढी राखलेला माणूस अत्यानंदी माणूस म्हणून ओळखला जातो. एक यशस्वी, तरतरीत माणसाचे लक्षण म्हणजे दाढी असलेला चेहरा. विलासी लोक जाड दाढी पसंत करतात. दाढी हे आळशीपणाचे लक्षणही मानले जाते.
...पण दाढी काढणार नाही!वकील झाल्यावर वडिलांनी दाढी काढायला सांगितले. मी ऐकत नाही म्हटल्यावर त्यावेळच्या जिल्हा न्यायाधीशांना हे मला सांगण्याची विनंती करण्यात आली. न्यायाधीश महोदयांनी मला बोलाविले अन् सांगितले, उद्या तुझा कोर्टाचा पहिला दिवस आहे. दाढी करून ये! पण मी दाढी ठेवूनच कोर्टात गेलो. तडजोड केली नाही. एकदा अमेरिकेला जाण्यासाठी मला व्हिसा काढायचा होता. व्हिसा सल्लागारांनी मला दाढीमुळे अमेरिकेत अडचण येईल. त्यामुळे दाढी काढावी असा सल्ला दिला; पण मी ठाम होतो. व्हिसा नाही मिळाला तरी चालेल; पण दाढी काढणार नाही, असे मी निक्षून सांगितलं.- अॅड. धनंजय माने, ज्येष्ठ विधिज्ञ
परिपक्व वाटावे म्हणून... लहानवयापासूनच मी व्यवसायामध्ये आहे. त्यामुळे समोरच्या पार्टीशी व्यवहार करताना आपण परिपक्व वाटावे म्हणून मी दाढी ठेवायला सुरुवात केली. आता तर दाढीची सवयच झाली आहे दाढीमुळे माझ्या व्यवसायात किंवा जीवनात कोणता अडथळा आला नाही. पासपोर्टवर पहिल्यापासूनच दाढी राखलेलं छायाचित्र असल्यामुळे परदेशातही कोणती अडचण आली नाही.- राम रेड्डी, उद्योजक
गरज होती म्हणून... खरं म्हणजे मी गरज म्हणून दाढी राखली. तीस - पस्तीशीत होतो, त्यावेळी उजव्या हाताच्या बोटाला फॅक्चर झाले होते. त्यामुळे दाढी करता येत नव्हती. लोक म्हणाले, छान दिसतेय, तुम्ही दाढी ठेवा. मीही दाढी ठेवली. पूर्वी दिवसाआड दाढी करायचो. दाढी राखल्यामुळे वेळ वाचायला लागला. शिवाय व्यक्तिमत्त्वही भारदस्त दिसायला लागले. कृषी विद्यापीठात मला ‘दाढीवाले देशपांडे’ म्हणून लोक संबोधू लागले.- डॉ. अजितकुमार देशपांडे, कृषी संशोधक.
दाढी पँथरचा ट्रेडमार्क जशी दाढी आली, तशी ती कधी काढलीच नाही. लग्नातही दाढी राखलेली होती. मी पँथरच्या चळवळीत होतो. दाढीही पँथरचा ‘ट्रेड मार्क’ होती. त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी दाढी ठेवलीच होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर दाढी आली. ती कायम आहे. दाढीमुळे कोणतीच अडचण वाटली नाही.- राजाभाऊ सरवदे, रिपाइं नेते
विधानभवनात उठून दिसतो!मला जशी दाढी आली, तसा आजपर्यंत कधीच वस्तरा लावलेला नाही. दाढी माझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसते. शिवाजी महाराजांच्या आचार -विचारांप्रमाणे तंतोतंत आचरण ठेवणे जमणार नाही; पण किमान दाढी राखून त्यांचा आदर्श अंगी बाणवावा, त्यामुळे दाढी राखली. दाढी माझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभूनही दिसते. दाढी आणि टोपीमुळे विधानभवनात मी २८८ आमदारांमध्ये उठून दिसतो.- भारत भालके, आमदार, पंढरपूर
आवड म्हणून ठेवली दाढी!स्वत:च्या लग्नातही दाढी काढली नाही. आवडच होती मला. आता दाढीची सवय झाली आहे आणि ओळखही झालीय. त्यामुळे दाढी काढली तर लोक नावे ठेवतील. पूर्वी राजे लोक दाढी ठेवायचे. दाढी म्हणजे शान आहे. अनेक देशांमध्ये प्रवास केला; पण दाढीमुळे कोणती अडचण आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे आदर्श आहेत. त्यांनाही पहिल्यापासून दाढी आहे.- शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष भाजप
पौरुषाचे लक्षणदोन वर्षांपासून दाढी राखली आहे. दाढी म्हणजे पौरुषाचे लक्षण आहे. दाढी राखताना घरामध्ये कोणीच विरोध केला नाही. शिवाय कोणती अडचणही आली नाही. दाढीमुळे वेगळी छाप पडते. मला संपूर्ण पांढरी दाढी आहे. त्यामुळे लोकांना आदर वाटतो; पण लोक आदर करतात त्यामुळे आपल्यावरही उत्तम आचरण ठेवण्याची जबाबदारी येते.-कैलास कनाळे, व्यावसायिक
आरोग्यसंपन्नतेसाठी देवाला साकडेमाझ्या पायाला सूज येणे व जखमा होत होत्या. चालणे मुश्कील झाले होते. तेव्हापासून मी देवाला संपन्न आरोग्याचे साकडे घातले. सध्या आरोग्य चांगले आहे. त्यामुळे दाढी ठेवली. आजारातून बरे झाल्यापासून दाढी काढावी वाटली नाही. त्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे.- राजू पिल्ले, क्रिकेट पंच