पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लहू सोपान खरात (रा. खरातवाडी, ता. पंढरपूर) याने वनक्षेत्रातील जागेत पत्र्याचे शेड मारून जनावरे बांधून व वैरणीची गंज करून अतिक्रमण केले होते. त्यांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी अनेकवेळा वनविभागाकडून कल्पना दिलेली होती. यावेळी तो आमची शेताची मोजणी करून माझी हद्द दाखवून द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती. त्यावर वनविभागाने शासकीय वनक्षेत्राचा नकाशा दाखवून व वनक्षेत्राची हद्द दाखवून अतिक्रमण केल्याबद्दल निदर्शनास आणून दिले होते.
१४ मार्च रोजी मेंढापूर गावच्या वनक्षेत्रामध्ये जनावरे प्रवेश करू नयेत म्हणून वनक्षेत्राचे भोवताली जेसीबी तसेच वन खात्याचे वनमजूर, कंत्राटी मजूर यांच्या साहाय्याने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने काम चालू होते.
३० मार्च रोजी सकाळी १० वाजता शासकीय गणवेशात व वनपाल सुनीता पत्की या वनक्षेत्राच्या भोवती चर मारण्याच्या ठिकाणी वन क्षेत्र जमीन गट नंबर १९५० मेंढापूर गावच्या हद्दीत गेल्या. नेहमीप्रमाणे जेसीबीच्या साहाय्याने सुनील विलास कदम, पोपट मारुती सुर्वे, भारत विठ्ठल जरग, सतीश भगवान पाटील, सुनील भगवान पाटील हे चर मारण्याचे काम करत होते.
दुपारी अडीचच्या सुमारास लहू सोपान खरात तेथे आला. त्याने वन जमिनीमध्ये ‘माझी जमीन आहे. मी अतिक्रमण काढणार नाही. चर मारण्याचे काम होऊ देणार नाही’ असा पवित्रा घेतला. त्यावेळी वनपाल सुनीता पत्की यांनी लहू खरात, अंकुश सोपान खरात, पप्पू सोपान खरात, अशोक हरी खरात, नंदू हरी खरात यांना बोलावून घेतले. समजावून सांगून नकाशा व जमिनीची हद्द दाखवून दिली.
यामुळे लहू सोपान खरात, नंदू हरी खरात, पप्पू सोपान खरात, अशोक हरी खरात, अंकुश सोपान खरात ( सर्व रा. खरातवाडी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----
तरीही केली मारहाण
वनरक्षक तुकाराम दिघे यांनी ‘तुमची काय अडचण असेल तर आमच्या वरिष्ठ संपर्क साधा’ असे सांगितले. यानंतर खरात यांनी जेसीबीची चावी काढून घेतली. तसेच सतीश पाटील यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. वनपाल सुनीता पत्की यांनाही दगडाने मारहाण केली.
----