येथील महासिद्ध मंदिराची पूजाअर्चा, भाविकांकडून मिळणाऱ्या रोख दक्षिणा आणि कोरडा शिधा यावरून गेल्या काही महिन्यांपासून फुलारी - पुजारी यांच्यात वाद होता. पिरप्पा फुलारी यांना १३ रोजी अज्ञातांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी शुक्रवारी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात महासिद्ध संगप्पा पुजारी, गौरप्पा सुरेश पुजारी, आमसिद्ध सुलतान पुजारी, आमसिद्ध सोमणा पुजारी (हंजगी), आमसिद्ध गुंडू अजावडरे (सर्व रा. भंडारकवठे) आणि इतर दोन अनोळखींचा समावेश आहे.
मारहाण करताना आम्ही देवाचे सोने चोरले असे गावभर सांगतोस का, म्हणत आमसिद्ध पुजारी (हंजगी) यांनी बेलपत्रीसाठी गळ्यात अडकवलेल्या झोळीने गळफास लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. तीन दिवस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर फिर्यादी पिरप्पा फुलारी यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फिर्याद दिली.
--------
फिर्याद देण्यासाठी का लागला वेळ
पिरप्पा फुलारी यांना मारहाण झाल्यानंतर उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवसांनंतर ते शुद्धीवर आले; पण त्यांनी फिर्याद दिली नव्हती. तिसऱ्या दिवशी पोलीस जबाब नोंदवण्यासाठी आले असता त्यांनी अर्धवट जबाब दिला. चौथ्या दिवशी स्वतः मंद्रुप पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली. आपला योग्य आणि वस्तुनिष्ठ जबाब नोंदवून घेतला जात नव्हता. त्यामुळे थेट पोलीस ठाण्यात यावे लागले, असे स्पष्टीकरण फिर्यादी पिरप्पा फुलारी यांनी दिले.
--------