गौडवाडी येथील अमर लक्ष्मण सोनार हा घरी ऑनलाईन अभ्यास करीत होता. त्यावेळी चुलतभाऊ अजय मदन गरड, अक्षय मदन गरड, मंगल मारुती संपूर्णे व आजी चुडाबाई शंकर सोनार यांनी घरासमोर येऊन वडील लक्ष्मण शंकर सोनार यांना तू जमीन वाटपाची कोर्टात केस का घातली, असे म्हणून शिवीगाळी करू लागले. बाहेर चाललेल्या गोंधळाच्या आवाजाने अमर सोनार, आई कल्पना, भाऊ सूर्यकांत बाहेर आले. यावेळी वरील लोक त्यांना शिवीगाळ करू लागले. म्हणून माझ्या वडिलांना शिवीगाळ का करता असे विचारले असता त्याचे वडील लक्ष्मण सोनार यांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले. भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेले असता मंगल संपूर्णे व आजी चुडाबाई सोनार या दोघीनी आई कल्पना हीस काठीने मारहाण केली.
यावेळी भांडणाच्या आवाजाने समाधान सोनार, विजय सोनार यांनी तेथे येऊन भांडण सोडविले. त्यावेळी वरील लोकांनी वडिलांना कोर्टातील केस माघारी घ्या अन्यथा तुम्हांला सोडणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेले. याबाबत अमर लक्ष्मण सोनार याने चौघांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.