मारुती खांडेकर यांनी अचकदाणी येथील दीपक पाटील याचा पार्टनर बुरंगेवाडी येथील अमोल माने यांच्याकडून गाई घेण्यासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मारुती खांडेकर यांनी त्यांच्याच डेअरीला दूध पाठवून त्या पैशांची परतफेड केल्याचे अमोल माने यांना माहीत होते. तरीही दीपक पाटील व बंडू देशमुख असे दोघेजण दुचाकीवरून खांडेकर यांच्या घरी येऊन आमच्या डेअरीकडून गाई घेण्यासाठी घेतलेले ५० हजार रुपये आताच्या आता दे, असे म्हणाले. यावेळी हे कर्ज मी दूध घालून फेडल्याचे खांडेकर यांनी सांगितले. मात्र त्यांनी काहीही ऐकून न घेता मारहाण केली. यावेळी पत्नी ललिता सोडविण्यासाठी आली असता दीपक पाटील याने पत्नी व बंडू देशमुख याने भाऊ नारायण खांडेकर याला शिवीगाळ करीत ढकलून दिले. यावेळी पत्नी व मुले जोरात आरडाओरड करू लागल्याने दोघांनी त्याला तिथेच सोडून दुचाकीवरून धूम ठोकली. याबाबत मारूती खांडेकर यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कर्जाची परतफेड करूनही दूध उत्पादकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:38 AM