सोलापूर : श्राद्धातील जेवणाच्या भांड्याच्या भाड्यावरून दीर-भावजयीत सळई व दगडाने मारहाण झाली. या मारहाणीनंतर उपचार घेत असलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पिंजारवाडी (ता. द. सोलापूर) येथे २८ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चौघांना वळसंग पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, सैफन गुडूभाई नदाफ (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सैनाजजी सैफन नदाफ (वय ३४, रा. पिंजरवाडी, ता. द. सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीरालाल गुडूभाई नदाफ, रफिक मीरालाल नदाफ, सलीम मीरालाल नदाब, ज्ञामतबी मीरालाल नदाफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगळवार त्या चौघांना पोलिसांनी अटक केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी व फिर्यादी नात्याने धीर भावजाई असून यातील आरोपी चौघांनी संगणमत करून सैनाजजीच्या पतीस त्यांच्या आई नाजबी गुडुभाई नदाफ हिच्या वर्ष श्राद्धातील जेवणाच्या ५०० रुपये भांड्याच्या भाडेवरून चिडून जाऊन सळई व दगडाने लाथा बुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याचवेळी फिर्यादी सैनाजजी या सोडवण्यास गेले असता पायावर सळईने मारून शिवीगाळ दमदाटी केली होती. गंभीर जखमी झालेल्या सैफन याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरवसे यांच्याकडे होता.
----------
आरोपींच्या अटकेसाठी दोन पथकांनी केली कामगिरी
पिंजारवाडीतील महिलेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी अटकेसाठी पोलीस उपनिरीक्षक शेख व सुरवसे यांची पथके नेमण्यात आली होती. दोन्ही पथकांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला असता चौघेही हाती लागले. याकामी सोनकांबळे, बंडीचोडे, मालचे, थोरात, गणेश पाटील, हनमोरे यांनी यशस्वी कामगिरी केली.