सांगोला : ४० हजार रुपयांच्या थकबाकीसाठी वीज वितरण कंपनीचे वसुली पथक ग्राहकाकडे गेले असता वीजचोरीचा प्रकार निदर्शनास आला. संतापलेल्या दांपत्याने आणि त्यांच्या दोन मुलांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत वायरमनच्या डाव्या हातावर कुर्हाडीने मारून जखमी केले.
जालिंदर दुर्योधन देवकते (रा. घेरडी) असे जखमी वायरमनचे नाव असून, शनिवारी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान सांगोला तालुक्यात घेरडी येथे गणपती मंदिराजवळ हा प्रकार घडला.
घेरडी (ता. सांगोला) येथील वीज वितरण कंपनी शाखेचे कनिष्ठ अभियंता अशोक आलदर, प्रधान तंत्रज्ञ वैशाली देशपांडे, वायरमन जालिंदर देवकाते, सर्जेराव सावंत, कंत्राटी कर्मचारी सोनाजी वगरे, सत्यवान खडतरे यांचे एक पथक २३ जानेवारी रोजी ३ दरम्यान महादेव पोळ यांच्याकडे विजेची ४० हजार रुपये थकबाकी वसुलीसाठी घरी आले होते. पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे थकबाकीची मागणी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांनी अरे-तुरीची भाषा केली. कर्मचाऱ्यांनी वापरातील विजेची उपकरणे व बिलात तफावत असल्याचे संशय आला. सर्व्हिस वायरची तपासणी केली असता सदर वायर मध्येच कट करून घरातील पिठाची गिरणी व पाण्याचे फिल्टरसाठी चोरून वीज वापरत असल्याचे दिसून निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता तुम्हाला काय करायचे ते करा म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून अंगावर धावून गेले. हा सारा प्रकार महिला कर्मचारी मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत असताना मोबाइल काढून घेतला. शेखर व सागर पोळ यांनी एवढ्यावरच न थांबता हातातील दगड घेऊन वायरमन जालिंदर देवकते यांना मारहाण केली. महादेव पोळ याने कु-हाडीने त्यांच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. याबाबत जालिंदर दुर्योधन देवकते यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी महादेव पोळ, पत्नीसह शेखर व सागर पोळ या चौघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.