आप्पासाहेब पाटील
सोलापूर : आई शिवणकाम तर वडील गवंडी कामगार..घरची परिस्थिती तशी हालाखीची पण परिस्थितीवर मात करीत पहाटे व रात्री अभ्यास करणारा ज्ञानेश दिवसा वडिलांना गवंडी कामासाठी कधीकधी मदत करायचा.. बांधकामाची विट रचता रचता ज्ञानेशने आपल्या आयुष्याची सुंदर भिंतच बांधली असल्याचा प्रत्यय सध्या दिसून येत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावातील ज्ञानेश्वर शिवाजी पलंगे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० परीक्षेत चांगले यश मिळविले. गुळवंची गावातील पहिला पीएसआय होण्याचा मान ज्ञानेश्वरने पटकाविला. ज्ञानेश्वर लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू होता. ज्ञानेशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुळवंची येथे झाले. माध्यमिक शिक्षण श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला सोलापूर येथे तर बारावी वाणिज्य शाखेतून हरिभाई देवकरण कॉलेज सोलापूर येथे पूर्ण केले. द ह कवठेकर पंढरपूर येथे डी एड पदवी त्याने प्राप्त केली. ही पदवी असताना देखील त्याच्या डोळ्यासमोर पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न होते. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात भरती झाला. पोलीस दलात भरती झाल्यावर तेवढ्यावरच न थांबता सातत्याने एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला आणि त्यामध्ये त्याने यश मिळवले.