सोलापूर : महापालिकेतील विषय समित्यांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत भाजपासोबत प्रचारात सहभागी होऊ नका, असे आवाहन करणाºया शिवसेनेने अखेर नमते घेतले आहे. शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा सोमवारी आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, महायुतीच्या मेळाव्यानंतर भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी काही मोजक्या लोकांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
लोकसभेप्रमाणे महापालिकेतही भाजपा-शिवसेनेची युती झाली आहे. सध्या विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेने महापालिकेतील सत्तेत वाटा मागितला आहे. त्यासंदर्भात पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यात चर्चा झाली. पण भाजपाकडून कोणत्याही प्रकारे निर्णय देण्यात आला नाही. लोकसभा निवडणुकीतील रणनीती ठरविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत आणि महेश कोठे यांच्या उपस्थितीत पदाधिकाºयांची बुधवारी बैठक झाली.
महापालिकेतील विषय समित्यांचा विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत शिवसैनिकांनी प्रचारात सहभागी होऊ नये, असे आवाहन करण्यात आले होते त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, सरचिटणीस विक्रम देशमुख यांनी पुन्हा महेश कोठे यांची भेट घेतली. या भेटीतही चर्चा झाली पण निर्णय झाला नाही. यानंतर रविवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांनी पुन्हा महेश कोठे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत महापालिकेतील सत्ता समीकरणांची चर्चा उचित होणार नाही. भाजपा नेते दिलेला शब्द पाळतील, असे सांगितले. त्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला.
महाराज विनाशक्ती प्रदर्शन अर्ज दाखल करणार
- - महापालिकेतील विषय समित्यांचा निर्णय स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घ्यावा, अशी सूचना दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. त्यानुसार निवडणुकीनंतर या विषयावर चर्चा होईल. महायुतीच्या पदाधिकाºयांचा मेळावा सोमवारी हेरिटेजमध्ये होणार आहे. या मेळाव्यानंतर दुपारी दोन वाजता डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी काही मोजक्या प्रतिनिधींसमवेत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपाचे दोन मंत्री, शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाºयांचा समावेश असेल, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी दिली.
शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक सोमवारी होईल. उमेदवारी अर्ज भरताना कोण किती कार्यकर्ते आणतील. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोण कोण माघार घेईल हे पाहावे लागेल. आडम मास्तरांची भूमिका काय राहील हे सुद्धा पाहावे लागेल. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. - महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना