कुर्डूवाडी : पंढरपूर-कुर्डूवाडी रस्त्यावर कुर्डू (ता. माढा) शिवारात बीड आगाराच्या एसटी बसखाली चिरडून बीडमधून निघालेला रोपळे (ता. पंढरपूर) गावाकडे निघालेला दुचाकीस्वार ठार झाला. मंगळवारी सकाळी ६.३० च्या सुमारास कुर्डू (ता. माढा) येथे हा अपघात झाला. मयत विकास सर्जेराव अडागळे घरगुती धार्मिक कार्यक्रमासाठी तो दुचाकीवरून निघालेला होता.
याबाबत मृत विकास याचा भाऊ श्याम सर्जेराव अडागळे (रा. सिरसदेवी) यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी एसटी चालक महादेव खंडेराव घोरपडे (५५, रा. नाथरा, ता. परळी, जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार अडागळे यांच्या नातेवाईकांचा पंढरपूर तालुक्यात रोपळे येथे घरगुती धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी कुटुंबातील सदस्य हे पिकअप वाहनातून निघाले. तत्पूर्वी विकास अडागळे हा दुचाकीवरून (एम. एच.२३/ एस. ६४१८) पुढे निघाला. कुर्डूवाडी-पंढरपूर रस्त्यावर कुर्डू गावच्या परिसरात एका हॉटेलजवळ येताच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एस.टी. बस ( एम. एच.२० / बी.एल.२०८७) ची दुचाकीस जोरात धडक बसली. अपघातात विकास हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.
या अपघातादरम्यान बघ्यांची गर्दी झाली, काही वेळात पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी विकासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे साेपविण्यात आला. मंगळवारी दुपारी नातेवाईक मृतदेह ताब्यात घेऊन मूळ गावी निघाले. या अपघातानंतर एसटी चालकास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास हवालदार माळी करीत आहेत.
---
पाठीमागून आलेल्या नातेवाईकांनी फोडला हंबरडा
अपघात सकाळी झाल्या त्यावेळी कुर्डू शहरातील काही लोक सकाळी व्यायामाला बाहेर पडले होते. सर्वप्रथम त्यांनी हा अपघात पाहिला आणि मदतीसाठी ते लगेच धावलेही. मात्र अपघात इतका विचित्र होता की अनेकांचे चित्त विचलित झाले आणि अक्षरशः स्तब्ध झाले. इतक्यात पाठीमागून पिकअपमधून येणारे नातेवाईकही अपघातस्थळी पोहोचले. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने अपघात परिसर अक्षरशःसुन्न झाला होता.
----
फोटाे