सोलापूर - शहरातील न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी मृत्यूपत्रात बदल केला असून डॉक्टरांची कन्या नेहा यांना सासरहून खास बोलावून घेतले होते. पूर्वीच्या मृत्यूपत्रामध्ये संपत्तीच्या हिस्स्याचा तुलनेने कमी असलेला हिस्सा यामध्ये वाढवला असून तो २० टक्के करण्यात आल्याचे जाणकार वकिलांनी सांगितले.
डॉ. वळसंगकर यांनी शुक्रवारी १८ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यावेळी नेहा आपल्या मातोश्रीसह घरीच होत्या. डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर कन्येच्या सोलापुरात येण्यावरून चर्चा झाली खरी, पण डॉक्टरांच्या मनात आत्महत्येचा विचार काही दिवसांपासून घोळत होता. त्यापूर्वी मृत्यूपत्राचं काम पूर्ण करून घ्यावे म्हणून मुलीला बोलावून घेतले हे स्पष्ट झाल्याचं त्या वकिलांनी सांगितले. आपल्या कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीतील वाटा मुलीला देण्याचा नियम आहे तो त्यानुसार दिलाच असेल. पण हा हिस्सा डॉक्टरांच्या अन्य संपत्तीचा असेल असेही ते म्हणाले.
दरम्यान, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या तपासाला गती मिळाली असली तरी त्यांच्या अचानक जाण्याची चर्चा असून आठवणींना उजाळा मिळत आहे. मृत्यूपत्रात बदल करण्यासाठी डॉ. वळसंगकरांनी त्यांच्या जवळच्या एका वकिलांना संपर्क साधला होता. ते कोल्हापूरला घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. त्यामुळे ते सोलापुरात नव्हते. त्यानंतर जवळच्या दुसऱ्या वकिलांना संपर्क साधला मात्र त्यांचाही संपर्क झाला नाही. त्यामुळे तिसऱ्या वकिलाची मदत घेऊन त्यांनी घाईघाईत मृत्यूपत्रात बदल केला.
पेनड्राइव्ह ताब्यात घेतले का?
मनीषाला अटक करण्याच्या निमित्ताने पोलिस निघाले होते. त्यांना घर मिळून यावे, म्हणून वळसंगकर कुटुंबातील सदस्याने आपल्या दोन सेवकांना तिच्याकडील पेनड्राइव्ह ताब्यात घेण्यासाठी काही व्यक्तींसोबत पाठविले. वस्तुतः हे लोक पोलिस होते.सेवकांना ते इलेक्ट्रॉनिक्समधील तज्ज्ञ असल्याचे सांगितले. सेवकांनी त्यांना मनीषाचं घर इथं असल्याचं दाखविल्यानंतर त्या तज्ज्ञांनी म्हणजेच पोलिसांनी दोन सेवकांना परत जायला सांगितलं, आम्ही पेनड्राइव्ह घेऊन येतो, असे ते सेवकांना म्हणाले.. आता पेनड्राइव्ह कुणाच्या ताब्यात आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे.