सोलापूर : मागील दीड वर्षापासून बंद असलेले थिएटर शुक्रवार २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. एक पडदा (सिंगल स्क्रीन) थिएटर चालकांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. यामुळे थिएटर बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याचे, सोलापूर थिएटर ओनर्स असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.
शासनाने थिएटर सुरू करण्यासाठी २२ ऑक्टोबरपासून परवानगी दिली आहे. मात्र, एक पडदा (सिंगल स्क्रीन) थिएटर चालकांनी आपल्या अडचणी सांगून थिएटर सुरू करण्याबाबत असमर्थता दाखविली होती. शासनाकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या. याला प्रतिसाद देऊन शासनाने एक पडदा थिएटरचे कोविड काळातील परवाना नूतनीकरण शुल्क माफ केले आहे. तसेच थिएटर परवाना हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली.
सोलापूर थिएटर ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत थिएटर सुरू कऱण्याचे ठरले आहे. त्यानुसार थिएटर चालक हे तयारी करत आहे. शासनाने कोविडबाबत सांगितलेल्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करणार असल्याचे सोलापूर थिएटर ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गांधी यांनी सांगितले.
कोरोना काळात दोन वर्ष थिएटर बंद असल्याने थिएटर व्यवसाय आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे तोडलेली वीज पुन्हा जोडावी, करमुक्त चित्रपटाचा परतावा द्यावा, चित्रपटगृहात इतर व्यवसाय सुरू करण्यास परवागी द्यावी, अशा मागण्या शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत.
------
दिवाळीत मोठे चित्रपट
शासनाने २४ ऑक्टोबरपासून थिएटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या दिवशी मोठे चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत. यामुळे आधीच प्रदर्शित झालेले लोकप्रिय चित्रपट थिएटरवर दाखविण्यात येण्याची शक्यता आहे. दिवाळी दरम्यान मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
------