बार्शी : पत्नी कामावरून घरी आल्यानंतर दारू पिण्याची सवय असलेल्या पतीराजाने दारू पिण्यासाठी तिच्याकडे २०० रुपये मागून शिवीगाळ केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने चक्क घरातील लाकडी बेलण्यानं डोकं फोडून पत्नीला जखमी केलं. शनिवारी दुपारी २ च्या सुमारास बार्शीतील बाशिंगे प्लॉट येथे ही घटना घडली. याबाबत जखमी झालेली पत्नी वेणू श्रीकांत अंधारे (वय ३६, रा. बाशिंगे प्लॉट, बार्शी) हिने शहर पोलिसात तक्रार देताच पतीराज श्रीकांत रावसाहेब अंधारे (४०) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलीस सूत्रांनुसार, यातील पतीराज हे ट्रान्सफोर्ट व्यवसाय करीत असून, अनेक दिवसांपासून दारू पिण्याची सवय आहे. यातील फिर्यादी महिला एका डॉक्टरच्या घरी स्वयंपाक करण्याचे काम करते. काम संपवून घरी आली असता झोपेतून उठून त्याने दारू पिण्यास २०० रुपये मागितले आणि भांडू लागला. आईलाही शिव्या देऊ लागला. आईला शिव्या का देता? असे म्हणताच ‘तू लय नखरे करू लागली, घरातच ठेवत नाही,’ असे म्हणून घरातील बेलणे उचलून डोक्यात तीन ठिकाणी मारून जखमी केले. या प्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.