सोलापूर: गिरणगाव ही सोलापूरची ओळख. येथील बहुतांश गिरण्या आणि गिरण्यांचे भोंगे बंद पडले असले तरी महापालिकेत आता पुन्हा भोंगा (सायरन) वाजणार आहे. मनपा अधिकारी आणि कर्मचाºयांना शिस्त लावण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हा भोंगा बसविण्यात आल्याचे महापालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितले.
मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी अधिकारी आणि कर्मचाºयांच्या कामाच्या वेळा निश्चित केल्या आहेत. या वेळेनुसार भोंगा वाजेल. कर्मचा?्यांनी सकाळी पावणेदहा वाजता कामावर हजर होण्याचे आदेश आहेत. सकाळी पहिल्यांदा भोंगा वाजेल. दुपारी दीड ते दोन ही वेळ जेवणासाठी असेल. दुपारी दीड वाजता आणि दोन वाजता भोंगा वाजेल. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता पुन्हा भोंगा वाजणार आहे. सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या उपस्थितीची नोंद बायोमेट्रिक प्रणालीव्दारे घेण्यात येत आहे असेही लेंगरेकर यांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील अनेक कर्मचारी दुपारच्या वेळेत उपस्थित नसल्याचे गुरुवारी दिसून आले. प्रशासकीय इमारतीमध्ये अस्वच्छता पसरली आहे. रस्त्यावर अस्वच्छता करणाºया नागरिकांवर मनपा कारवाई करीत आहे. मात्र प्रशासकीय इमारतीमधील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.