सोलापूर : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमातीचे एक हजार २७६ व ५१८ दिव्यांग लाभार्थ्यांना २ कोटी ५६ लाख ९९ हजार रुपयांचे साहित्य खरेदीसाठी अनुदान वाटपाची सोडत गुरुवारी काढण्यात आली. लकी ड्रॅा (चिठ्ठ्या टाकून) पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे ही सोडत पारदर्शक असावी, यासाठी सोडतीच्या सर्व प्रक्रियेचे व्ही.डी.ओ.चित्रीकरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून समाज कल्याण विभागामार्फत (सेस फंडातून) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (२० टक्के) व दिव्यांग लाभार्थ्यांना (५ टक्के ) व्यवसायाभिमुख साहित्यासाठी अनुदान देण्यात येते. चालू आर्थिक वर्षांसाठी (२०२२-२३) दोन कोटी ५६ लाख ९९ हजार इतकी तरतूद सेस फंडातून या योजनेसाठी करण्यात आली आहे. त्या – त्या तालुक्याच्या पंचायत समित्यांमार्फत पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागवून त्या प्रस्तावांची छाननी करुन गुरुवारी (दि.२) जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात चिठ्ठयांद्वारे लाभार्थी निश्चित करण्यात आले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. समाज कल्याण विभागाचे कक्षअधिकारी शीतलकुमार कंदलगावकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर, विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड, शशिकांत ढवळे यांनी ही प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली.
सोलापुरातील नागनाथ मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहातील संस्कार नागेश पाटील व विश्वेश्वर कलप्पा हिरनळी या दोन पाचवीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. साहित्याचे नाव व सोडतीत भाग्यवान ठरलेल्या अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांची संख्या व कंसात एकूण अनुदानाची रक्कम पुढील प्रमाणे – शिलाई मशीन – ३५२ लाभार्थी (३० लाख रुपये), सायकल – ५०० (२५ लाख), पिठाची चक्की – ३५८ (६९ लाख ९९ हजार रुपये) व झेरॅाक्स मशीन – ६६ (३० लाख रुपये) त्य व दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या, साहित्य व एकूण अनुदान पुढील प्रमाणे – शेळी गट १३९ (६७ लाख रुपये), पिठाची गिरणी २५१ लाभार्थी (४९ लाख रुपये) झेरॅाक्स मशीन १०८ लाभार्थी (४९ लाख रुपये).