प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नोंदणी केलेल्या ४६८५ महिलांपैकी ४ ६१७ महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे तब्बल दोन कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. मंगळवेढा शहरातील केवळ १५० महिलांचे या वर्षात नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. दत्तात्रय शिंदे, डॉ. संजय कांबळे, डॉ. वर्षा पवार, डॉ. भीमराव पडवळे, डॉ. श्रीपाद माने, फार्मसी ऑफिसर सी. वाय. बिराजदार, हणमंतराव कलादगी, विस्तार अधिकारी प्रदीपकुमार भोसले, आरोग्यसेवक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, आदी परिश्रम घेत आहेत.
शहरातील अनेक गोरगरीब महिला वंचित
ग्रामीण रुग्णालयातील युजर आयडी व पासवर्ड या तांत्रिक कारणास्तव प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे अर्ज गेले काही महिने भरले नाहीत. त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. काही दिवसांपासून या योजनेचे अर्ज घेण्याचे काम सुरू झाले आहे. यावर्षी १५० पर्यंत लाभार्थी संख्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
असा मिळतो योजनेचा महिलांना लाभ
योजनेच्या लाभासाठी गरोदर महिलांनी आशा, अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य सेविकांशी संपर्क साधून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, पतीचे आधार कार्ड, बाळाच्या जन्माचा दाखला व माता संरक्षण कार्डची प्रत आवश्यक आहे. पहिला हप्ता एक हजार रुपये गर्भधारण झाल्यानंतर (१५० दिवसांच्या आत), नोंदणीनंतर दुसरा हप्ता २ हजार (तीन महिन्यात) तर तिसऱ्या हप्त्यात २ हजार रुपये बाळाच्या जन्मनोंदणीनंतर मिळतो, अशी माहिती विस्तार अधिकारी प्रदीपकुमार भोसले यांनी दिली.
कोट ::::::::::::::
गर्भवती आणि स्तनदा मातांना लाभ
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेद्वारे पहिल्या अपत्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व स्तरातील गर्भवती महिला, स्तनदा मातांना योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. आधार कार्ड आणि लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात माहेरच्या आणि सासरच्या नावात तफावत असल्याने शासनाकडून प्राप्त झालेले पैसे बँकेद्वारे नामंजूर केले जातात. अशा समस्या येऊ नयेत म्हणून लाभार्थी महिलांनी नोंदणी करताना आपली कागदपत्रे अपडेट करून द्यावीत. जेणेकरून पैसे मिळविताना समस्या येणार नाहीत.
- डॉ. नंदकुमार शिंदे
वैद्यकीय अधिकारी