माढा : माढ्यातील शुक्रवार पेठ येथे विवाहितेचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी नवरा, सासू सास-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयताचे वडील महंमदमुसा गुलामदस्तगीर अन्सारी (वय ५२, रा. शालिमार कॉलनी, एमआयडीसी उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.
उस्मानाबाद येथील प्लाॅट नावावर करुन देण्याच्या मागणीसाठी चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी माढा पोलिसात नवरा व सासू, सासरा अशा तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माढ्यातील शुक्रवारी पेठेत शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. सना इरफान मोमीन (वय २७) असे मयताचे नाव असून इरफान रजाक मोमीन, रजाक मकबूल मोमीन,आसिया रजाक मोमीन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार मयत सना इरफान मोमीन (वय २७) हिचे लग्न झाल्यानंतर दोन महिन्यापासून तिला सासरी नवरा इरफान रजाक मोमीन, सासरा रजाक मकबुल मोमिन, सासू आशिया रजाक मोमीन यांनी दोन महिने व्यवस्थित नांदून त्यानंतर तिला तुझ्या आई-वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला काही दिले नाही. मानपान केला नाही म्हणत उस्मानाबाद येथील प्लॉट आमच्या नावावर कर असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण केली. सतत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. तिचा नवरा इरफान रजाक मोमिन याने शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तिचा गळा दाबून जीवे मारले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करीत आहेत.