सोलापूर - शहरातील बाजारपेठ खुली करण्याचे आदेश कोणत्याही क्षणी येऊ शकतात. राज्य सरकारने महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना यासंदर्भात विशेष अधिकारी दिले आहेत. लोकांना आता आयुक्तांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे.
शहरातील बाजारपेठ खुली करावी यासाठी व्यापारी, राजकीय नेत्यांनी आंदोलन पुकारले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे विशेष प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष प्रस्ताव मागवून घेतला. सोलापूर शहरातील निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे होते.
मात्र पुणे, मुंबई प्रमाणे सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांना स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर सोलापूर अनलॉक करण्यास अनुकूल आहेत. आयुक्तांचे आदेश कोणत्याही क्षणी येऊ शकतात, असे आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.