कुर्डूवाडी : बिगर क्रमांकाच्या ट्रॅक्टरने शासकीय वाहनास जोरदार धडक देऊन ५ जणांना गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणाची विचारपूस करायला गेलेल्या तहसीलदारास शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींकडून ट्रॅक्टरसह दीड ब्रास वाळूही जप्त करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, बिटरगावचे तलाठी ज्ञानेश्वर चांगदेव बोराडे, बारलोणीचे तलाठी मधुकर दादा काळे, पिंपळखुंटेचे तलाठी प्रबुद्ध हरिदास माने, मानेगावचे राजेंद्र राऊत हे एमएच-४५/डी-००३८ या वाहनातून वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालत होते. त्याचवेळी मुंगशी शिवारातील सीना नदीच्या पात्रातून रघु कृष्णा खरात (रा. पितापुरी, ता. परंडा, जि. उस्मानाबाद) आणि त्याचा साथीदार सागर शंकर लोंढे हे दोघे वाळू घेऊन निघाले होते.
कारवाई होऊ नये अथवा पथक समोर येऊ नये यासाठी मंगेश माणिक जगताप (रा. मुंगशी) हा वॉचर म्हणून वाळू वाहनाच्या पुढे आपल्या दुचाकीवर (एमएच-१४/सीबी-५१११) निघाला होता. त्याचवेळी शासकीय पथकाने वाहन थांबविण्याचा इशारा केला. कारवाई टाळण्यासाठी वाळूने भरलेल्या वाहनाने पथकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यात पथकातील सर्वच जण जखमी झाले. वाढत्या हल्ल्यामुळे अधिकारी व कर्मचारी भयभीत झाले आहेत.
सागर लोंढेचा प्रताप- घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार सदाशिव पडदुणे हे घटनास्थळी आले. घटनेची विचारपूस करीत असताना सागर शंकर लोंढे याने पडदुणे यांना शिवीगाळ करीत त्यांना जमिनीवर पाडले आणि बेदम मारहाण करीत आपला प्रताप दाखवून दिला. याप्रकरणी ज्ञानेश्वर बोराडे यांनी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. नि. ईश्वर ओमासे करीत आहेत.