शीतलकुमार कांबळे
सोलापूर : नवीपेठेतील मोबाईल गल्लीमध्ये फक्त सण-उत्सवालाच नव्हे तर इतरवेळीही मोबाईलची विक्री मोठ्या प्रमाणात होते. सध्या बाजारात अनेक प्रकारच्या मोबाईल उपलब्ध आहेत. मोबाईल खरेदी करताना तरुणी या सेल्फी काढण्यासाठी चांगल्यातला चांगला कॅमेरा असलेला मोबाईल घेतात, तर तरुण हे मोबाईलचा रॅम, मेमरी व प्रोसेसर हे पाहूनच खरेदी करतात.
सध्याच्या काळात स्मार्ट फोन ही चैनीची वस्तू नाही तर गरजेची वस्तू बनली आहे. स्मार्ट फोन हे साधारणपणे सहा हजारांपासून ते दीड लाखांपर्यंत मिळतात. या मोबाईलमुळे फक्त मोबाईल दुकानेच नाही तर एक्सेसरीजची मोठी उलाढाल नवीपेठेतील मोबाईल गल्लीत होते. मोबाईल कव्हर, हेडफोन, डिस्प्ले, लॅमिनेशन, बॅटरी, चार्जर, ब्लूटूथ, यूएसबी केबल, मेमरी कार्ड आदींची विक्री मोठ्या प्रमाणात होते. यात गॅरंटी व वॉरंटी असलेल्या एक्सेसरीजसोबत चीनमधील एक्सेसरीजही मिळतात. स्क्रीन गार्ड ५० रुपयांपासून तर हेडफोन हे ८० रुपयांपासून ३ हजार रुपयापर्यंत, ब्लूटूथ ३५० ते ४ हजार रुपयांपर्यंत मिळतात. मोबाईल खरेदी करताना ८ जीबी रॅम, १२८/२५६ जीबी मेमरी, ५ हजार एमएच बॅटरी कॅपॅसिटी असलेले मोबाईल उपलब्ध आहेत.
मोबाईल क व्हरमध्येदेखील अनेक प्रकार आहेत. डायमंड व एंजल असणाºया कव्हरला तरुणी पसंत करतात. अशा मोबाईल कव्हरला स्टोन कव्हर असे म्हणतात. तरुणी या गुलाबी रंगाचे कव्हर तसेच वेगवेगळ्या फुलांचे आकर्षक डिझाईन असलेल्या कव्हर्सची मागणी करतात.
तरुणांत अँटिक मोबाईल कव्हरला जास्त मागणी आहे. कव्हरवर लिहिलेल्या वेगळ्या प्रकारच्या विनोदी मजकुराला ते पसंती देतात. पबजीसारखे मोबाईल गेम्स, हॉलीवूडमधील चित्रपट, रेसिंग कार, इंग्रजीतला मजकूर असलेल्या मोबाईल कव्हरला देखील मोबाईल गल्लीमध्ये मागणी आहे.
सेल्फी स्टीकला पर्याय..- काही वर्षांपासून सेल्फी काढण्याची असलेली क्रेझ ही आताही कमी झालेली नाही. मात्र, एक्सेसरीजमध्ये सेल्फी स्टीकची खरेदी करण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. मोबाईलच्या कॅमेºयामध्ये वाईड अँगलची सुविधा दिल्यामुळे सेल्फी स्टीकची गरज आता उरली नाही. वाईड अँगलच्या माध्यमातून मोठी फ्रेमही मोबाईलमध्ये सहज बसते. तसेच जास्त झूम न करता अनेक जण सेल्फीमध्ये बसू शकतात. काही मोबाईलमध्ये दोन फ्रंट कॅमेरा असल्यामुळे सेल्फी काढणे अधिक सोपे झाले आहे.
मोबाईल घेताना फक्त तो कसा दिसतो, याकडे न पाहता रॅम, मेमरी कॅपॅसिटी आदीदेखील पाहिले जाते. सध्याच्या वाढत्या स्पर्धेत भारतीय कंपन्यांचे मोबाईल मागे पडल्याचे दिसत आहे, तर चीनमधील कंपन्यांच्या मोबाईलला मागणी वाढली आहे.- प्रशांत चोळ्ळे, मोबाईल एक्सेसरीज विक्रेता.
मोबाईल कव्हर, लॅमिनेशनसाठी अनेक ग्राहक हे फक्त शहरच नाही तर ग्रामीण भागातून देखील येत असतात. मागील काही दिवसांत मोबाईलला गोरीला ग्लास लावून घेणाºयांची संख्या जास्त होती. आता फोरडी प्रकारच्या ग्लासला युवक पसंती देत आहेत.- दिनेश साळुंके, मोबाईल एक्सेसरीज विक्रेता.