सोलापूर : वातावरण बदलामुळे किंवा काही चुकीचं खाल्ल्यामुळे, धुळीत फिरल्यामुळे अनेकांना लगेच खोकला होतो आणि त्यांची स्थिती वाईट होते. अनेकांना फक्त रात्री इतका खोकला येतो की, त्यांच्या झोपेचं खोबरं झाल्याशिवाय राहत नाही. कदाचित अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात; पण याकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडू शकते.
रात्री झोपेत असताना खोकला आल्यास झोपमोड होते. पुन्हा झोप न आल्याने पुढच्या दिवशी काम करताना त्याचा त्रास होते. तो पूर्ण दिवस खराब होतो. रात्री झोपेत वारंवार खोकला येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. रात्री खोकला लागण्याचा त्रास दिवसाही होऊ शकतो. नाकाचे हाड वाकडे असणे, नाकातील पडदा वाकडा असणे, सायनसला सूज येणे, नाकास विशिष्ट प्रकारचा स्त्राव वाहणे आदी कारणे असू शकतात. हा त्रास नेमका कशामुळे होतो, याचे निदान करणे गरजेचे आहे.
कारणे काय?
सायनसचा सूज येणे, धुळीत फिरणे, कारखान्यात काम करणे, सतत एसीमध्ये रहाणे, धुरात फिरणे, धूम्रपान, रात्री जास्त जेवण करणे, मसाला व तेलकट पदार्थाचे अधिक सेवन करणे, रात्री जास्त जेवणे आदी कारणांमुळे रात्री झोपेत खोकला येतो.
सोलापुरचे वातावरण हे कोरडे आहे. तसेच हवेत धुळीचे प्रमाण जास्त आहे. नाकातून बारीक कण गेल्यास खोकला लागू शकतो. अनेकांना ॲलर्जी व पित्ताचाही त्रास असू शकतो. यामुळे वारंवार सर्दी होणे, डोकेदुखी, धाप लागणे आदी त्रास होतात. सतत हा त्रास होत असल्यास कान-नाक-घसा तज्ञांकडे जाऊन पुर्ण तपासणी करणे गरजेचे आहे.
- डॉ. अभिजीत जगताप, सार्वजनिक आरोग्य तज्ञ