Pandharpur Vidhan Sabha ( Marathi News ) : शरद पवारांशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या भालके यांना जनता त्यांची जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी टीका खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रणिती शिंदे यांनी फक्त भाजप हाच आपला विरोधक आहे, बाकीचे गिनतीमध्येही येत नाहीत, अशा शब्दात आपली मांडली.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. सोमवारी अनिल सावंत यांच्या प्रचार सभेत खासदार मोहिते-पाटील म्हणाले, मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती कोणी केली आहे, याचा गौप्यस्फोट मी येत्या काही दिवसात करणार आहे. भालके यांनी उमेदवारीसंदर्भात प्रतीक्षा न करता पवार यांचा विश्वासघात करून काँग्रेसची उमेदवारी मिळवली आहे. भालके यांच्या उमेदवारीला सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे जबाबदार नसून भागीरथ भालके यांनी वरिष्ठांची दिशाभूल केल्याचं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली. त्यावर प्रणिती शिंदे यांनी भाषणामध्ये थेट भालकेंची उमेदवारी आपण कशा पद्धतीने खेचून आणली हे सांगितलं. आपला फक्त विरोधक भाजप आहे, बाकीचे इकडच्या तिकडच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांची गिनतीही होत नाही, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी खिल्ली उडवली.
पंजा बाजूला ठेवा अन् तुतारी घ्या, असा शरद पवारांनी दिला होता निरोप
पंढरपूरला राष्ट्रवादीची जागा असूनही तिथे अचानक काँग्रेसकडून २७ ऑक्टोबरला उमेदवारी जाहीर केली गेली. आम्हाला सगळ्याला धक्का बसला. पवार यांनी तुम्हाला एवढ्या प्रेमाने वाढवले, तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला उमेदवारी देणार होते. शरद पवार यांनी २८ तारखेला अख्खा दिवस तुमची वाट पाहिली, आपण एबी फॉर्मची बदली करू, तुम्ही पंजा बाजूला ठेवा अन् तुतारी घ्या, असे भालके यांना निरोप दिला, असे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
भालकेंचा मोहिते पाटलांना इशारा
भगीरथ भालके यांनी फसवणूक केल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला होता, यावर आता भागीरथ भालकेंनी पलटवार केला आहे. 'माझ्याबद्दल अपप्रचार करू नका, माझी बदनामी करू नका. मी उमेदवारीची मागणी केली होती. तीन दिवसांचा वेळ त्यांना देऊ, हे जर थांबलं नाही आणि उमेदवार मागे घेतला नाही तर मोहोळ आणि माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये त्याचे पडसाद उमटतील. याची किंमत मोजावी लागेल', असा इशारा भागीरथ भालकेंनी दिला आहे.