भगीरथ भालके व्यासपीठावर; अजित पवार अन् जयंत पाटील बंद खोलीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 10:20 AM2021-03-21T10:20:33+5:302021-03-21T10:21:30+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर (सोलापूर) :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी चाचणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आज रविवारी सकाळी पंढरपुरात आले आहेत.
एका सार्वजनिक हॉलमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याचे नियोजन झाले होते, मात्र वाढती गर्दी तसेच आपापली भूमिका पटवून देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे गोंधळ वाढला. हे पाहून व्यासपीठावर बसलेले अजित पवार आणि जयंत पाटील उठून बंद खोलीत गेले. 'जाहीर चर्चा नको. जे काही सांगायचे ते तुम्ही खाजगीत बंद खोलीत सांगा,' असे अजित पवारांनी स्पष्टपणे सुनावले.
त्यामुळे व्यासपीठावर भगीरथ भालके एकटेच बसले होते. बंद खोलीत अजित दादा, जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्ता भरणे यांनी प्रत्येकाशी व्यवस्थित चर्चा केली. या मतदारसंघात नेमकी कुणाला उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीसाठी फायद्याची ठरेल, याचीही चाचपणी केली. कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेवर अहवाल तयार करून तो आज दिल्लीत शरद पवार यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर चर्चा करुन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा निर्णय घेतला जाईल.