सोलापूर : दत्त चौकातील शुभराय महाराज मठात आषाढ मास नवरात्रोत्सव सुरू असून या नऊ दिवसात दरराेज सायंकाळी महिला मंडळांची भारुडं अन् भजनं होताहेत. बुधवारी आषाढी एकादशीदिनी पवमान म्हणत अभिषेक करून शहरातून रथोत्सव काढला जाणार असल्याची माहिती शुभांगी बुवा यांनी दिली.
यंदा रथोत्सवाचे २३९ वे वर्षे असून १७८५ पासून हा उत्सव होतोय. आषाढी एकादशीच्या दिवसी देवाची मूर्ती स्थापन केली आणि तो दिवस देवाचा वाढदिवस म्हणून धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. याला आषाढीचा उत्सवही म्हणून पाहिले जाते. यंदा ६ जुलै ते १४ जुलै दरम्यान दररोज दुपारी आणि सायंकाळी महिला भजनी मंडळाचे भजन सादरीकरण होत आहे. केवळ भजनच नव्हे तर भारुड, टिपरी, फुगडी अशा विविध कलेचे सादरीकरण होत आहे.
आषाढी एकादशीच्या आदल्या दिवसी १६ जुलै रोजी दशमीला भक्तांना फराळ देऊन आषाढ मासातील नवरात्रोत्सवाची सांगता होत आहे. त्याच दिवसी सोमवंशी आर्य क्षत्रीय समाजाचे बांधव मंदिर परिसरात २६ फुटी रथाची बांधणी करतात आणि दुसऱ्या दिवसी दत्त चौकातून रथ निघतो.
भक्तीभावात निघणार रथोत्सव* बुधवारी, १७ जुलै रोजी सकाळी ७:३० वाजता पांडुरंग उपाध्ये आणि सहकारी यांच्यावतीने देवाच्या मूर्तीस पवमान म्हणत अभिषेक केला जाणार आहे.* सकाळी १०:३० वाजता दुधगीकर कुटुंब आणि शुभराय भजनी मंडळाच्या वतीने हरिपाठ सादर होणार आहे.* दुपारी १२ वाजता महाआरती करून दत्त चौकातून स्टार बेकरी मार्गे रथ मार्गस्थ होईल.* नवीपेठ कॉर्नर, चौपाड विठ्ठल मंदिर, पंजाब तालीम, मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, टेलिफोन भवन, चाटीगल्ली, सराफ कट्टा, भांडे गल्ली, माणिक चौक, फौजदार चावडी, खाटीक मशीद मार्गे दत्त चौकात रथ परत येईल.