बार्शी तालुका हा रब्बीचा तालुका असला तरी, मागील काही वर्षांपासून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी वाढली आहे. या हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे. फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच कृषी निविष्ठा खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट अथवा भेसळयुक्त बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांची खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पक्क्या पावतीसह खरेदी करावी. पावतीवर पीक, वाण संपूर्ण लॉट नंबर, बियाणे, खते, कीटकनाशके, कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव नमूद असावे. तसेच पावतीवर विक्रेत्याची व खरेदीदाराची स्वाक्षरी अथवा अंगठा असल्याशिवाय पावती स्वीकारू नये, असे आवाहन केले आहे.
एवढ्या खतांची केली मागणी...
या हंगामात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी नोंदवली आहे. त्यामध्ये युरिया १०१६४, डीएपी ३५३७, एसएसपी २५६७, एन.पी.के संयुक्त ४९४४, एमओपी २१५३, अशी एकूण २३३६५ मेट्रिक टन खताची मागणी नोंदवलेली आहे. सद्यस्थितीला युरिया ९५०, डीएपी ५३५, एसएसपी ९१०, एनपीके संयुक्त २३९६, एमओपी २७२ असा ५०६३ टन खत साठा शिल्लक आहे.
-----
भरारी पथकाची नियुक्ती
बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची विक्री सुरळीत होण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय भरारी पथक नेमले आहे. यामध्ये निरीक्षक वजन मापे मंडल कृषी अधिकारी (संबंधीत कार्यक्षेत्र) कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक ), पंचायत समिती हे सचिव असणार आहेत.
चौकट
खरीप हंगाम सन २०२१ मध्ये बार्शी तालुक्यात खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र ७८००० हे. असून त्यामध्ये खालीलप्रमाणे पिकांचे क्षेत्र व बियाणांची आवश्यकता आहे. तूर - ८६०० हेक्टर बियाणे ८८६ क्विंटल, सोयाबीन - ५०,००० हेक्टर बियाणे १५००० क्विंटल, मका - ६०० हेक्टर बियाणे १२० क्विंटल, उडीद ११४००, हेक्टर बियाणे २३५ क्विंटल, मूग - १९०० हेक्टर बियाणे २९ क्विंटल, कांदा- ५५००, हेक्टर बियाणे ४४० क्विंटल. हे सर्व बियाणे सार्वजनिक व खासगी बाजारातून उपलब्ध होणार आहे.
चौकट
बार्शी तालुक्यात प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण खते दुकानावर गर्दी करणे हे आपल्या व आपल्या कुटुंबीयांसाठी अतिशय धोकादायक आहे. तालुक्यातील गावा-गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपणास लागणाऱ्या खतांची यादी शेतकरीनिहाय बनवून कृषी विभागातील संबंधीत कर्मचाऱ्यास संपर्क केल्यास कृषी विभाग आपल्या गावातच खते पाेहोच करण्याची व्यवस्था करेल, असे शहाजी कदम यांनी सांगितले.
-----