सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे समर्थक भारत जाधव यांनी शुक्रवारी सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य बंगल्यावर प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
आगामी काळात भाजपचे आणखी काही नेते काँग्रेसमध्ये दाखल होतील, असे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत जाधव यांनी नुकतेच सुशीलकुमार शिंदे आणि सुरेश हसापुरे यांची भेट घेतली होती.
भारत जाधव यांचे वडील हरिभाऊ जाधव हे उत्तर सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते आणि पंचायत समितीचे माजी सभापती होते. जाधव कुटुंबीय हे अकलूजच्या मोहिते-पाटलांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. पाच वर्षांपूर्वी त्यांनी आमदार सुभाष देशमुख गटाचे काम सुरू केले होते. शुक्रवारी त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला.