डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताला लाभलेलं विद्वान असं रत्न होतं. विद्येचा वाण त्यांच्या रोमारोमात तेजोमय तळपत होता. माणूस एखाद्या क्षेत्रात निष्णात असू शकतो, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानसशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, कायदेशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक क्षेत्रात डॉक्टर होते. विविध विषयांवरील डाॅक्टरेट या पदव्या ते लिलया भूषवत होते. परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळविणारे ते पहिले भारतीय होते. दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट व डी.एससी पदव्या मिळविणारे पहिले दक्षिण आशियाई म्हणून बाबासाहेब होते. त्यांच्या जीवनात भारतातील सर्वाधिक प्रतिभाशाली व उच्चविद्याविभूषित व्यक्ती व शक्ती म्हणून त्यांचा गौरव व आदर होता. १८९६ ते १९२३ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकाॅनाॅमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थामधून उच्च शिक्षण घेतले. अनेक पदव्यांचे ते मानकरी होते नव्हे तर पदवीला त्यांच्या अभ्यासातील नैपुण्यामुळे पदवी मिळत असे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी जगप्रसिद्ध कायदेपंडित जेनिंग यांची भेट घेऊन भारताची राज्यघटना लिहिण्याची विनंती केली तेव्हा जेनिंग सरांनी सांगितले हे काम माझ्यापेक्षा माझे गुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्टपणे करू शकतात. पुढे बाबासाहेबांनी ते केलेही.
भारतीय घटनेचा सरनामा अर्थात संविधान हे संपूर्ण घटनेचा सार आहे. बाबासाहेबांच्या लोककल्याणकारी विचारांची एकाग्रता, सूक्ष्मता, भव्यता, सर्वांगीण परिपक्वता, विद्वत्ता, नियोजनबद्धता, देशवासीयांबद्दलची प्रेमळ दिशादर्शकता सिद्ध होते. वंचित व उपेक्षित घटकांच्या विकासासाठी त्यांनी केलेले नियोजन आजही मार्गदर्शक आहे.
भारतीय घटनेत सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, एकात्मता, अखंडता, बंधूता ही मार्गदर्शक तत्त्वे बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक रोवली. ती दीपस्तंभ आहेत. सामान्य व्यक्ती हा त्यांच्या जीवनप्रवाहाचा प्राण होता. कोणावरही अन्याय होऊ नये, त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, असा बाबासाहेबांचा कटाक्ष होता. गुलामगिरीत राहणे किंवा ठेवणे हा मानवजातीला कलंक आहे ही त्यांची विचारधारा आपल्याला खरा मानवधर्म शिकवते. संधीची समानता आणि समानतेतील संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे असा बाबासाहेबांचा आग्रह होता. विषमता हा रोग नष्ट व्हावा यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. मानवतावाद हाच खरा धर्म आहे. धर्माच्या नावाखाली अधर्म होऊ नये यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. दुर्दैवाने आजही त्यांनी सांगितलेला अर्थ शोधण्यात व वागण्यात आजही समाजात अपुरेपणा जाणवतो.
विद्या, विनय आणि शील ही बाबासाहेबांची दैवते होती. आयुष्यभर विद्यार्थी म्हणून शिकण्यात आणि समाजशिक्षक म्हणून देशवासीयांना शिकवण्यात बाबासाहेबांना आनंद वाटत होता. पुस्तके आपली मित्र आहेत तर ग्रंथ हे गुरू आहेत ही त्यांची शिकवण अजरामर आहे. विनयतेशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. शिक्षणामुळे विनयता यावी, दुर्बलता नाही असं त्यांना मनोमन वाटे. चारित्र्य हेच खरे शिक्षण ही आचारसंहिता आम्हाला बाबासाहेबांनी दिली. शिक्षणातून दृष्टी यावी, दुष्टता नाही हा त्यांचा विचार संपूर्ण मानवजातीला विचारप्रर्वतक आहे.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांचा जीवनसंदेश आहे. शिक्षण हे जीवनमूल्ये विकसित करण्यासाठी शिका व समाजातील गुन्हेगारी संपविण्यासाठी संघटित व्हा असा मौलिक विचार त्यांनी रुजविला. संघटित होऊन गुन्हेगारी होत असेल तर ती बाबासाहेबांच्या विचारांची व आचारांची प्रतारणा होईल हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. जर शिक्षणातून, विधायक मार्गाने प्रश्न सुटत नसतील तर संघर्ष केलाच पाहिजे, तो आपला नैसर्गिक हक्क आहे असे ते ठामपणे सांगतात. बाबासाहेबांचा विचार, आचार, संचार, प्रचार तमाम भारतीयांसाठी अनंतकाळ आधार होवो...त्यांच्या मनीचा भाव आपल्या तनामनातून समभाव होवो हीच सदिच्छा..
- ह.भ.प.रंगनाथ काकडे गुरुजी.
श्री निवास, विद्यानगर, वैराग.