सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत बुधवार पेठेतील पंचाची चावडी येथे पार पडलेल्या ऐतिहासिक वतनदार महार परिषदेला ९३ वर्षे पूर्ण झाली असून, दि. २६ व २७ नोव्हेंबर १९२७ रोजी झालेल्या या परिषदेच्या ठरावामध्ये धर्मांतराबाबत संकेत देण्यात आले होते.
परिषदेत पाच हजारांहून अधिक लोक सहभागी होते. दि.२६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून लोकांनी येण्यास सुरुवात केली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या परिवारातील सदस्यांसह मंडपात आले. लोकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करत त्यांचे स्वागत केले होते. परिषदेचे स्वागताध्यक्ष जीवाप्पा काळे यांनी कामकाजाला सुरुवात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘अस्पृशोन्नतीचा आर्थिक पाया’ याबाबत आपले विचार प्रकट केले. ज्या दिवशी अस्पृश्यांची उपजीविका स्वतंत्र होईल व ते स्वतःच्या मानवी हक्कासाठी स्वतःचे जीवितही वेचण्यासाठी तयार होतील, तो दिवस अस्पृश्यांचाच काय पण हिंदू व हिंदुस्तान यांच्या दृष्टीने काही वेगळाच असेल, यात शंका नाही. जर आपणाला माणुसकी मिळवायची असेल तर त्यांनीही रयतेच्या गुलामगिरीतून मुक्त झाले पाहिजे, जर त्यांना मुक्त व्हायचे असेल तर त्यांनी निश्चिय केला पाहिजे. त्याशिवाय त्यांचा मार्ग सुकर होणार नाही, असे मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषणात केले.
दुसऱ्या दिवशीच्या परिषदेत मांडले आठ ठराव
- सकाळी अकरा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेला सुरुवात झाली. यामध्ये एकूण आठ ठराव मंजूर झाले. यातील एक ठराव असा होता की, चातुर्वर्ण्याच्या चौकटीत सापडून चिरडून गेलेल्या अस्पृश्य वर्गाला आपली सुटका करून घेण्यासाठी धर्मांतर करावे की काय, याचा विचार करावा लागेल, असा ठराव मांडून धर्मांतराचे संकेत परिषदेमध्ये देण्यात आले होते.
हे होते परिषदेचे कार्यकारिणी सदस्य...
- विश्वनाथ बनसोडे, मुकिंदा बाबरे, निवृत्ती बनसोडे, रामा सरवदे, पापा तळभंडारे, विठ्ठल सरवदे, भिकाजी तळभांडरे, तुकाराम बाबरे, बळी तळमोहिते, उद्धव शिवशरण, हरिभाऊ तोरणे हे परिषदेचे कार्यकारी सदस्य होते.