महेश कुलकर्णी सोलापूर : पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना ‘श्रीं’चे वाहन असलेल्या रथाची सजावट सुरू आहे. ६५ वर्षे जुन्या सागवानी लाकडाचा रथ सोनेरी, गडद तपकिरी या रंगांनी सजला असून, उत्सवाच्या दिवशी आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
१९२४ साली मार्कंडेय मंदिराची स्थापना झाली. स्थापनेनंतर २९ वर्षे नारळी पौर्णिमेच्या दिवशी देवाची पालखी मिरवणूक निघत होती. १९५३ साली नरसय्या रामय्या बुर्ला यांनी ‘श्रीं’च्या उत्सवासाठी खास रथ आंध्र प्रदेशातून बनवून घेतला. सागवानी लाकडाचा रथ २० फूट लांबी, १५ फूट उंचीचा आहे.
याचवेळी रथाला नरसय्या आकेन यांनी चांदीचा वर्ख करून दिला. या रथाच्या सारथ्याचा मान सुरुवातीपासून वर्षांपासून अंकाराम बंधूंचा आहे. रथ ओढण्यासाठी त्यांच्या घरातील बैलजोडी असते. नारळी पौर्णिमेच्या आधी महिनाभरापासून या बैलांना खुराक दिला जातो. कुठलेही काम लावण्यात येत नाही.
७.२ कि.मी. च्या मिरवणूक मार्गावर १४ तासांचा प्रवास हा रथ करतो. पुढे पालखी आणि मागे रथ. पालखीत चांदीचे शिवलिंग; रथात दीड फूट उंचीची मार्कंडेय महामुनींची सोन्याचा मुलामा असलेली मूर्ती बसविली जाते. नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा रथ मंदिरात आणला जातो. रथाच्या पूजेचा मान सुदर्शन गुंडला परिवाराला आहे. त्यांनी पूजा केल्यानंतर रथ मिरवणुकीसाठी रवाना होतो.
- ७.२
कि.मी. प्रवास
- १४
तास मिरवणूक
- २०
फूट रुंदी
- १५
फूट उंची
- ०२
टन वजन
- १०० किलोंचे दागिने
- मार्कंडेय मंदिरात मूळ मूर्तीला १०० किलोंचे सोन्याचे दागिने आहेत. वर्षात एक दिवस म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी हे दागिने मूर्तीला परिधान करण्यात येतात.
मिरवणुकीत विणलेली वस्त्रे ‘श्रीं’स अर्पण- नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजता निघणारा रथोत्सव रात्री १२ वाजेपर्यंत चालतो. यादरम्यान मिरवणुकीत शिवलिंग आरकाल आणि त्यांचे कुटुंबीय वस्त्रे विणतात. ही वस्त्रे रथातील उत्सवमूर्तीला अर्पण करून रथोत्सवाचा समारोप करण्यात येतो.
शहरात तेलुगू भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मार्कंडेय रथोत्सवासाठी रात्री १२ पर्यंत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही पत्राद्वारे गृहमंत्र्यांकडे केली आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याने मंडळांनी शांततेत रात्री दहाच्या आत मिरवणूक संपवावी.- सुरेश फलमारीसरचिटणीस, पद्मशाली ज्ञाती संस्था