सोलापूर : भाऊसाहेब गांधी यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव होता. महात्मा गांधीजींचे गुरु हे जैन धर्माचे अभ्यासक होते. सर्वधर्म समभाव आणि समाजाप्रती सेवाभावी वृत्ती हा जैन धर्माचा सार आहे. संतांची शिकवण देखील याच विचारांवर आधारित होती. त्यामुळेच भाऊसाहेबांनी आयुष्यभर संतांप्रमाणे समाजाचे विश्वस्त म्हणून काम पाहिले, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ समीक्षक व इतिहास संशोधक डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
श्रीमान भाऊसाहेब गांधी यांच्या ९७ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानच्या वतीने सेवाभावी पुरस्काराचे वितरण झाले. डॉ. मोरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. याप्रसंगी ते बोलत होते. पुरस्काराचे यंदा चौदावे वर्ष आहे. अध्यक्षस्थानी वालचंद शिक्षण समुहाचे मानद सचिव तथा भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रणजित गांधी होते. यावेळी विश्वस्त भूषण शहा, प्रतिष्ठानचे सचिव प्रदीप पंडित आदी उपस्थित होते.
विद्यार्थी विकास योजनेचे संस्थापक रवींद्र कर्वे (ठाणे) यांना श्रीमान भाऊसाहेब गांधी सामाजिक प्रेरणा पुरस्कार व सन्मानपत्र आणि डब्ल्यूआयटीचे निवृत्त प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांना श्रीमान भाऊसाहेब गांधी सेवाभावी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. चांदीचा रथ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.