कुर्डूवाडी : भेंढ (ता. माढा) ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असताना सरपंच व गावातील इतर नागरिक राजकीय द्वेषातून त्रास देत असल्याचा आरोप करीत ग्रामसेवक प्रवीण झाकर्डे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे बदलीची मागणी केली आहे. यामुळे पंचायत समितीच्या प्रशासनात एकच गोंधळ उडाला आहे.
आर्थिक व्यवहारातील कागदपत्रे न देता त्याचे बिल काढण्यासाठी सरपंच डॉ संतोष दळवी यांच्याकडून दमदाटी होत असल्याची लेखी तक्रार कंत्राटी ग्रामसेवक झाकर्डे यांनी झेडपीच्या सीईओंकडे केली आहे. २४ सप्टेंबर २०२० पासून भेंड ग्रामपंचायतीमध्ये प्रामाणिकपणे काम करीत आहे. स्वत:चे गाव अमरावती असून, गावात काम करताना सरपंच व इतर नागरिक इतर नागरिकांकडून त्रास होत आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजातील आर्थिक व्यवहारात कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर न करता त्याचे बिल काढण्यासाठी धनादेश तयार करून द्या म्हणून सरपंच दळवी यांनी दबाव टाकून दमदाटी केली. १५ जुलै रोजी पंचायत समिती बीडीओच्या कार्यालयात सरपंचांनी गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांदेखत अर्वाच्य शब्दांत बोलत हात उगारल्याचा आरोप केला असून, अशा ठिकाणी काम करणे अवघड झाले आहे. गाव बदलून दुसरे मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
.......
ग्रामसेवक झाकर्डे यांनी माझ्यावर केलेल्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. त्यांना कधीही दमदाटी केली नाही, बिल काढण्यासाठी दबाव आणला नाही. उलट मी त्यांना नवीन असल्याने सहकार्य करीत आलो आहे. काही विरोधकांना हाताशी धरून केलेला राजकीय स्टंट आहे.
- डॉ. संतोष दळवी
सरपंच,भेंड
........................