मल्लिकार्जुन देशमुखे
मंगळवेढा : खून प्रकरणातील आरोपीला दवाखान्यात तपासणीसाठी म्हणून जेलमधून बाहेर काढल्यानंतर त्याला खासगी वाहनाने भरदिवसा त्याच्या घरी घेऊन जाऊन सामिष जेवणाची पार्टी करणाऱ्या त्या दोन पोलिसांना निलंबीत करण्यात आले आहे. कैद्याला जिभेचे चोचले पुरवणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्या दोन पोलिसांच्या निलंबनाबाबतचे आदेश जारी केले आहेत. अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या आंबे गावाचा एक आरोपी सबजेल मध्ये आहे, त्याच्या घरी दि १७ जुलै रोजी सामिष जेवणाची पार्टी होती, त्यास हजेरी लावण्यासाठी त्या दिवशी गार्ड ड्युटीवरील बजरंग माने व उदय ढोणे या दोन पोलिसांनी पोटदुखी कारण दाखवून कैद्याला ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्याचा बहाणा केला. दुपारी १२.३० कारागृहातील रजिस्टर ला नोंद केली व जेलबाहेर पडताच त्याला खाजगी वाहनाने थेट त्याच्या आंबे गावी पार्टीसाठी नेण्यात आले.
तब्बल दोन तास गावी थाबुंन जेवणावर ताव मारून त्यांनी पुन्हा मंगळवेढा ग्रामीण रुग्णालय गाठले, तेथे दुपारी २.३० वाजता पोहचून एक पोटदुखीसाठी गोळी घेऊन पुन्हा जेलकडे रवाना झाले, मात्र त्या पार्टीच्या दुसऱ्या दिवशी कारागृहात कैद्याच्या कोरोना तपासणीत तो पार्टी साठी गेलेला कैदी पॉझिटिव्ह आढळला व एकच खळबळ माजली, त्यासोबत जेवणासाठी हजर असणारे अनेकजनाच्या मनात भीतीचे काहूर माजले व अनेकांनी स्वतःहून घरात विलगिकरण करून घेतले होते, ही चर्चा सर्वत्र सुरू झाल्याने त्या कैदी पार्टीचे बिंग फुटले.
याबाबत 'लोकमत' मध्ये गुरुवारच्या अंकात सविस्तर वृत्त येताच पोलीस दलात मोठी खळबळ माजली. या प्रकरणाची चौकशी एक दिवसात पूर्ण होऊन तात्काळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्या दोन पोलिसांवर कारवाई बाबत डीवायएसपी दत्तात्रय पाटील व पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी सखोल चौकशी करूूनअहवाल सादर केला त्या आधारे पहिल्या टप्प्यात निलंबनाची कारवाई केली असून दुसऱ्या टप्प्यात बडतर्फीची कारवाई निश्चित आहे असे त्यांनी सांगितले.