सोलापूर : बंधाराच होणार नाही... झाला तर पाणी साठणार नाही... रस्त्याच्या पुलाखाली बंधारा होत असतो का, सुभाष देशमुख थापाड्या आहे... असा प्रचार विरोधकांनी सुरू केल्यामुळे बॅरेजच्या कामाचे भूमिपूजन करावे लागले, असे आ. सुभाष देशमुख म्हणाले. मी श्रेयासाठी कधीच काम करीत नाही, असेही विरोधकांना उद्देशून देशमुख म्हणाले.
सोलापूर- सांगली चार पदरी रस्त्यावर तिऱ्हे येथे सीना नदीवरील बॅरेज बंधाऱ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. सीना नदीवरील पुलांचे रूपांतर बॅरेजमध्ये करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून या बंधाऱ्याचे काम होत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. काँग्रेस सरकारने कर्ज माफीसाठी जेवढे पैसे दिले त्यापेक्षा अधिक पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना देत असल्याचा दावा आ. देशमुख यांनी केला. या बॅरेजमधील पाण्याचा उपयोग उत्तर, दक्षिण व मोहोळ तालुक्यातील शेतीला होईल, असे देशमुख यांनी सांगितले.
बापू सतत शेतकरी व सर्वसामान्यांना समोर ठेवून काम करतात, असे भाजपचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांनी सांगितले.
कार्यक्रमाला अविनाश महागावकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रीमंत बंडगर, तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, सुनील गुंड, भारत जाधव, राम जाधव, विशाल जाधव, राष्ट्रीय महामार्गचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते.
---
कृष्णा-भीमा स्थिरीकरण...
विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी जिल्ह्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कृष्णा- भीमा स्थिरीकरण होणे गरजेचे आहे, माजी उपमुख्यमंत्री विजयदादा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय नेत्यांना स्थिरीकरणाची संकल्पना सांगितली असल्याचे म्हणाले. सुभाषबापूंच्या प्रयत्नातून तिऱ्हे परिसराचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असल्याचे मोहिते- पाटील म्हणाले.