सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा अध्यासन केंद्र व अश्वारूढ पुतळ्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात येत्या ऑक्टोबरमध्ये भूमिपूजन सोहळाही होईल, असे सामंत यांनी आज बैठकीत सांगितले.
बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा व अध्यासन केंद्र संदर्भात शिक्षणमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाइन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, आमदार रोहित पवार, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने आणि कुलसचिव डॉ. विकास घुटे यांचा सहभाग होता.
यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अध्यासन केंद्र आणि पुतळा उभारण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती दिली. प्रस्तावात असलेल्या प्रमुख बाबींची माहितीही त्यांनी यावेळी शिक्षणमंत्री सामंत यांच्याकडे सादर केली. त्यानंतर शिक्षणमंत्री सामंत यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात येईल व विद्यापीठामध्ये अहिल्यादेवींच्या नावाने अध्यासन केंद्र आणि अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव मदत करण्यात येईल, असे सांगितले.
त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्यात भूमिपूजन करण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. त्यादृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून तयारी करण्यात यावी, अशाही सूचना यावेळी मंत्री सामंत यांनी दिल्या. कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी यावेळी आभार मानले.