अक्कलकोट : तालुक्यात भुरीकवटे येथे हातभट्टी दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रार करूनही त्यावर हालचाली होत नाहीत. पोलीस कारवाई करतात; पुन्हा दोन दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती रहाते. गावातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
भुरीकवटे गावची लोकसंख्या जेमतेम दोन हजार. मात्र, त्याठिकाणी तब्बल सात अवैध हातभट्टी दारू विक्रीची अड्डे आहेत. गावात ज्येष्ठांसह अनेक तरुण दारूच्या आहारी गेले आहेत. यामुळे गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. संध्याकाळ झाली की गावात दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ सुरू असतो. अनेकवेळा पोलिसांची कारवाई झाली आहे. त्यानंतर पुन्हा दोन दिवसात जैसे थे परिस्थिती निर्माण होते. कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी मागणी गिरमल बेळ्ळे, संगीता कुंभार, गुरुबाई कुंटोजी, भागीरथी बेळ्ळे या त्रस्त महिलांनी केली आहे.
--
अतिदारूमुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला. मुलगाही दारू पिऊन दररोज गोंधळ घालतो. कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. वैतागलो आहोत.
- शंकरेव्वा बेळ्ळे
महिला ग्रामस्थ
---
यापूर्वी अवैध दारू धंद्याविरोधात तक्रार अर्ज पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, दारूबंदी उत्पादन शुल्क विभाग आशा अनेक ठिकाणी दिला. त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणेवरचा विश्वास उडतो.
- जगदेवी कुंटोजी
महिला ग्रामस्थ
---
आलूरमधील सराईत गुन्हेगाराचा अड्डा
उमरगा तालुक्यातील आलूर येथील एका सराईत गुन्हेगाराने भुरीकवठेत ठाण मांडून हातभट्टी अड्डा चालवला आहे. काही व्यक्तींच्या वरदहस्तामुळे त्याने गावात येऊन दारू धंदा सुरू केला आहे. दहशत माजवली आहे. यापूर्वी त्याला उमरगा पोलिसांनी हद्दपार केले आहे. मात्र त्याने भुरीकवठेत अवैध धंद्याच्या माध्यमातून जम बसवला आहे.
-कुठे आहेत हातभट्टीची अड्डे
आलूर रस्त्या (१), एसबीआय ग्राहक सेवा परिसर (३), भीमनगर येथे (१), भुरीकवटे- वागदरी रोड (१) असे सहा हातभट्टी अड्डे सुरू आहेत. तसेच उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे. उलट पाण्याच्या बाटलीतून हातभट्टी दारू देण्याची शक्कल लढवली जात आहे.
--
यापूर्वी अनेक वेळा दारूधंद्यांवर कारवाई केली आहे. पुन्हा दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लवकरच पथकामार्फत कारवाई करून बंदोबस्त करण्यात येईल.
- विपीन सुरवसे
बीट अंमलदार