पंढरपूर : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाव्दारे पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणारे ४ तराफे नष्ट केले तर शिरढोण येथे वाळू उपसा करत असताना एक जेसीबी नष्ट करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी गुरूवारी दुपारी माध्यमांना दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे व तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पंढरपूर येथील चंद्रभागा नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे सुमारे २ लाख किंमतीचे ४ तराफे पुर्णपणे नष्ट करण्यात आले असून कृषा नाना नेहतराव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शिरढोण (ता.पंढरपूर) येथून नदीपात्रालगत वाळू चोरी करत असताना एक जेसीबी पकडून तो शासकीय धान्य गोदाम येथे जमा करण्यात आला. त्याचबरोबर पंढरपुर येथील गाढवावरून वाळू चोरी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध चॅप्टर केसची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचे तहसिलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले. या भरारी पथकात मंडलाधिकारी विजय शिवशरण, तलाठी अमर पाटील, प्रमोद खंडागळे, श्रीकांत कदम, महेश कुमार सावंत, गणेश पिसे, प्रशांत शिंदे, वाहन चालक नितीन काळे तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशन चे कर्मचारी सहभागी होते.