सोलापूर : तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपल्या शिक्षणाची जादू सातासमुद्रापार पसरवल्यानंतर रणजितसिंह डिसले गुरुजींचा प्रभाव बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावरही दिसला. कौन बनेगा करोडपती शोमध्ये जेव्हा डिसले गुरुजी अमिताभ बच्चन यांच्या समोर गेले तेव्हा डिसले गुरुजींना पाहून बच्चन म्हणाले, ‘मी अजून विद्यार्थी असून, तुमच्यासारख्या मोठ्या शिक्षकांना प्रश्न विचारण्याएवढा मोठा झालो नाही’.सोलापुरातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर डिसले हे नुकतेच ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झाले होते. त्यात त्यांनी १४ प्रश्नांच्या टप्प्यांपर्यंत पोहोचून ५० लाख रुपये जिंकले. ही रक्कम ते महिलांचे न्यायदान आणि मुलांच्या शिक्षणासाठी एका संस्थेला देणार आहेत.याबाबत डिसले म्हणाले, अमिताभ सरांना भेटणे हा अविस्मरणीय अनुभव होता. एप्रिलमध्येच कार्यक्रमासाठी त्यांनी विचारणा केली होती. कोरोनामुळे मी नकार दिला होता.
विचारांचा राजेशाहीपणा बच्चन यांच्याकडून शिकावाआम्ही शूटिंगचा पूर्ण दिवस अभिताभ बच्चन यांच्या सोबत होतो. शिक्षकांप्रति त्यांच्या मनामध्ये खूप आदर आहे. आम्ही सोबत जेवायला बसल्यानंतर आम्ही पहिला घास घेतल्यानंतरच त्यांनी जेवायला सुरुवात केली. छोट्या-छोट्या गोष्टींतून त्यांच्या विचारांचा राजेशाहीपणा दिसून येतो. सोबतच त्यांचे विचार कृतीत व्यक्त होतात. त्यांनी माझ्या क्यू आर कोड शिक्षणप्रणालीबद्दल भरभरून कौतुक केले, ‘काश मैं आपका स्टुडंट होता’ असे ते यावेळी म्हणाल्याचे डिसले यांनी सांगितले.