भाजपला मोठा धक्का; कल्याणराव काळेंचा गुरुवारी अजित पवारांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 03:05 PM2021-04-06T15:05:35+5:302021-04-06T15:05:42+5:30

मनधरणीसाठी आलेल्या निंबाळकरांना काळेंचा निरोप; अजितदादांबरोबर ठरलंय!

Big blow to BJP; Kalyanrao Kale will join NCP in the presence of Ajit Pawar! | भाजपला मोठा धक्का; कल्याणराव काळेंचा गुरुवारी अजित पवारांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपला मोठा धक्का; कल्याणराव काळेंचा गुरुवारी अजित पवारांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीत प्रवेश

googlenewsNext

पंढरपूर : मनधरणीसाठी आलेल्या खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी अजितदादांबरोबर ठरलंय? असा निरोप दिल्यानं निंबाळकर परतले.

काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार बुधवारी बारामती येथे अजित पवार यांच्याशी झालेल्या अंतिम चर्चेनंतर काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला. गुरुवारी अजित पवार यांच्या दौऱ्यात ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याची कुणकुण लागताच खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी दुपारी कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात मनधरणीसाठी गेले होते. त्याचवेळी आ. संजय शिंदे आल्याने दोघांचीही पंचाईत झाली होती.

कल्याणराव काळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्या अडचणीत असलेल्या कारखान्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर ते आश्वासन पाळले नसल्याने काळे भाजपवर नाराज होते. ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. मात्र, अधिकृत प्रवेश केला नव्हता.

सध्या पंढरपुरात पोटनिवडणूक सुरू आहे. त्यामुळे काळेंनी भाजप वा महाविकास आघाडीत सक्रिय व्हावे, यासाठी दोन्हींकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. ३० मार्च रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर होते. त्याचवेळी संजय शिंदे यांनी काळेंच्या आढीव येथील फार्महाऊसवर पक्ष प्रवेशाविषयीचा प्लॅन शिजला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी त्यांची चर्चा घडवून आणली. त्याच दिवशी आ. संजय शिंदे हे कल्याणराव काळेंना घेऊन बारामती येथे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना झाले. या भेटीत मागे झालेल्या घडामोडी विसरून कल्याणराव काळे यांना पक्षात सामावून घेत त्यांना भविष्यात राज्य सरकारतर्फे आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काळेंनी राष्ट्रवादी प्रवेश निश्चित केला.

शिष्टाई ठरली अयशस्वी

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे कल्याणराव काळे हे पक्षात अस्वस्थ होते. मात्र, कोणत्याही मोठ्या निवडणुका नसल्याने भाजपकडून त्यांच्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. कल्याणराव काळे यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीदरम्यान भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत जाण्याचे जवळपास निश्चित केल्याची कुणकुण लागली. तेव्हा भाजपचे नेते, माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी काळेंनी पक्ष न सोडता भाजपसोबत राहावे यासाठी प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांशीही संपर्क करून दिला. मात्र, काळे आपल्या मतावर ठाम होते. त्यामुळे मोहिते-पाटील पिता-पूत्रांसह निंबाळकरांची शिष्टाई अयशस्वी ठरली आहे.

 

 

Web Title: Big blow to BJP; Kalyanrao Kale will join NCP in the presence of Ajit Pawar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.