राकेश कदम/मिलिंद राऊळ, सोलापूर: येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाची कारवाई सुरू झाली आहे. भल्या पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमाराला सोलापूर महापालिका आणि पोलिसांची यंत्रणा कारखान्यामध्ये चिमणी पाडकामासाठी घुसली. कारखान्याच्या परिसरात दीड ते दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. चारही बाजूनं सर्व रस्ते बंद बंद करण्यात आले आहे. एक किलोमीटर परिसरात सर्व रस्ते सुनसान आहेत.
दोन डझन रुग्णवाहिकाही तैनात कारखाना स्थळावर आहेत. पोलीस यंत्रणाला विरोध करण्यासाठी शेकडो कामगार प्रवेशद्वारासमोर थांबले होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांना उचलले. जेसीबी अन् बुलडोझरसह पाडकाम यंत्रणा घुसली. सकाळी साडेसहा वाजता चिमणी पाडकाम सुरू होणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेट तोडून पोलीस कारखान्यात घुसले; चिमणीचं कनेक्शनही जेसीबीनं कट केलं
सकाळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने स्पॉटवर पोहोचले, त्यावेळी कारखान्याचे गेट बंद होते. पोलिसांनी कामगारांना गेट उघडायला सांगितले. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर नाईलाजानं पोलिसांनीच गेट तोडले. दरम्यान चिमणीच्या दरवाज्याजवळ जेसीबी पोहोचला. तिथून चिमणीचं कनेक्शनही तोडण्यात आलं. पोलीस यंत्रणाला विरोध करण्यासाठी शेकडो कामगार प्रवेशद्वारासमोर थांबले होते. मात्र पोलिसांनी आंदोलकांना उचलले. थोड्याच वेळात चिमणी पाडकामाला सुरुवात होणार आहे.