सोलापूर : जिल्ह्यात किमान १ हजार व त्यापेक्षा जास्त बंधारे बांधण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत. अटल भूजल योजना राबवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेत सोमवार ३१ मे रोजी अटल भूजल योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी अं. च. कदम, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, सहाय्यक व संरक्षक बी. जी. हके, पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता स. ह. अलझेडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्ने. धो. गावडे, अभियंता व्ही. बी. कोरे, भीमा पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता ओमप्रकाश येलद प्रमुख उपस्थित होते.
--------------
ग्रामसभेतून चर्चा घडवून जनजागृती
पुढच्या पिढीसाठी भूगर्भात पाणी अधिक प्रमाणात असणे आवश्यक आहे. मृदा व जलसंधारण व पुनर्भरणसाठी लोकांमध्ये जागृती करावी लागणार आहे. सोपे तंत्रज्ञान लोकांना समजावून सांगत सर्व गावात या विषयावर ग्रामसभांमधून चर्चा घडवून जनजागृती करण्यात येणार आहे.
---------
सोलापूर जिल्ह्यात सर्व शासकीय इमारतीचे जलपुनर्भरण करावे. अटल भूजल योजनेत सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी मेहनत घ्या. सप्टेंबरपर्यंत चांगले नियोजन करून त्या प्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- दिलीप स्वामी, सीईओ, जिल्हा परिषद, सोलापूर