सोलापूर: सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे हद्दीत पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. याबाबतची माहिती मिळताच महापालिकेने दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. दरम्यान, उजनीहून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने एक दिवसाचे रोटेशन उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे.
सोलापूर शहराला उजनी धरणातून पाण्याचा पुरवठा होतो. दररोज उजनीतून शहरासाठी पाईपव्दारे पाणी येते. शिवाय हिप्परगा, औज, टाकळी बंधार्यातूनही पाण्याचा शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जातो. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाकडील उजनी ते सोलापूर दरम्यान असलेल्या जलवाहिनीला बाळे येथे मोठया प्रमाणात गळती झाल्याने ते तातडीने दुरूस्तीकरिता १७ जुलै २०२३ रोजी शटडाऊन घेण्यात आले. त्यामुळे उजनी येथून पाण्याचा उपसा कमी होणार असल्याने १८ जुलै २०२३ रोजीचा शहरातील पाणीपुरवठा एक रोटेशन उशिरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.