सोलापूर : जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार आहे. लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनचे कर्मचारी, 50 वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड रूग्ण असे चार टप्पे केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली. पहिल्या टप्प्यात 30 हजार 284 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.
कोरोना लसीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, लस व शित साखळी व्यवस्थापक डॉ. गजानन जाधव, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल नवले, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ शिवाजी थोरात, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुध्द पिंपळे, धर्मगुरू काझी अमजद अली यांच्यासह समाज कल्याण, कामगार कल्याणचे प्रतिनिधी, एनसीसी कमांडर, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी, माध्यमिक आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, आयएमए प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत लसीकरणाबाबत नियोजन आणि आराखड्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली. श्री. शंभरकर म्हणाले, कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आणि औषधाशिवाय पर्याय नाही. समाजामध्ये लसीकरणाबाबत जागरूकता आणण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. लसीकरणाचा आराखडा आणि नियोजन अचूक होण्यासाठी प्रयत्न करावेत. लस देण्यासाठी डाटा फिडिंगच्या कामाला गती देऊन त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व नियोजन 16 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.