सोलापूर : शिक्षक पतसंस्थेच्या सचिव पदाच्या वादातून सुपारी देवून मारेकऱ्यांमार्फत शिक्षक पतसंस्थेचे सचिव बजरंग ज्ञानोबा धावने यांचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेल्या ५ आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने अपिलात निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणाचे हकीकत अशी की, बजरंग जाधव रा. डिकसळ, ता. मोहोळ हे सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक पतसंस्थेमध्ये सचिव होते. सोसायटी मधील कर्मचारी पंढरीनाथ पवार, प्रशांत सावंत व गहीनीनाथ धावने हे सचिव बजरंग धावने यांना सचिवपद सोड म्हणून वारंवार त्रास देत होते व भांडण करत होते. बजरंग धावने हे पतसंस्थेच्या सचिव पदाचा राजीनामा देत नसल्यामूळे चिडून जाऊन आरोपी पंढरीनाथ पवार, प्रशांत सावंत व गहीनीनाथ धावने यांनी प्रकाश शिंदे व सोन्या उर्फ उमेश मेटकरी यांना बजरंग धावने यांच्या खुनाची सुपारी दिली. १६ फेब्रुवारी २०११ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास बजरंग धावने हे त्यांचा मुलगा स्वप्नीलसह गावाकडे जात असतांना पडसाळी व मसले चौधरी गावाच्या सरहद्दीवर प्रकाश शिंदे व सोन्या मेटकरी यांनी धारधार शस्त्रांनी बजरंग धावणे यांचा खून केला असे सरकारपक्षाचे म्हणणे होते.
प्रकाश शिंदे, सोन्या मेटकरी, पंढरीनाथ पवार, प्रशांत सावंत व गहीनीनाथ धावने यांना या प्रकरणी सोलापूरचे तत्कालीन जिल्हा न्यायाधीश आशिवीनकुमार देवरे यांनी कलम ३०२, १२० ब अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सदर शिक्षेविरुध्द सर्व आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केलेले होते. सदर अपीलाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साधना जाधव व न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर झाली. कट केल्याबद्दलचा पुरावा व आरोपींच्या ओळखपरेड बाबतचा पुरावा विश्वासहऱ्या नसल्याने खंडपीठाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपी पंढरीनाथ पवार व प्रशांत सावंत तर्फे ॲड.सत्यव्रत जोशी, ॲड. जयदीप माने, प्रकाश शिंदे, उमेश मेटकरीतर्फे ॲड.अनिता अग्रवाल, गहिनीनाथ धावणे तर्फे ॲड. विरेश पुरवंत यांनी तर सरकारतर्फे ॲड. गीता मुळेकर यांनी काम पाहिले.